Join us

अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:07 AM

नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळती दुर्घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेची ...

नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळती दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेची उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वतःहून दखल घेतली. या दुर्घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेचा अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.

ही घटना कशी घडली? याची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र ४ मेपर्यंत सादर करा, असा आदेश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिला.

सुनावणीदरम्यान महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची माहिती न्यायालयाला दिली.

नाशिक महापालिकेने मुख्य सचिवांना दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, ऑक्सिजनची टाकी बसवणे, देखभाल करणे व टाकीत ऑक्सिजन भरण्याचे काम खासगी कंपनी तयो निप्पोन सॅन्सो कॉर्पोरेशनला देण्यात आले होते. ऑक्सिजन वाहत होता; परंतु कमी दबाव होता. त्याच दिवशी या टाक्यांमध्ये ऑक्सिजन भरला गेला. मात्र, व्हॉल्व्हमध्ये गळती असल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. दुरुस्तीसाठी अभियंत्याला बोलावण्यात आले होते. दुरुस्तीच्या काळात ऑक्सिजनचा दबाव कमी झाला. तो इतका कमी झाला की सुमारे १ तास २० मिनिटे ऑक्सिजन पुरवठा बंद झाला. ही स्थिती अत्यंत वाईट आहे. या ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांना जीव गमवावा लागला, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.

प्रशासनाने ऑक्सिजनची टाकी दुरुस्त केली आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला, अशी माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने सर्व माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश कुंभकोणी यांना दिले. राज्य सरकारने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी बुधवारीच (दि. २१) उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली आहे.

.............................