Join us

आयपीएलसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 5:55 AM

मुंबईत आयपीएलचे सामने होऊ नये, हीच चिंता याचिकाकर्तीला होती. त्यांचा हेतू साध्य झाला आहे. जर दोन महिन्यांनी स्थिती सुधारली तर ते सामने आयोजित करू शकतात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयपीएलचे सामने पुढे ढकलावे किंवा रद्द करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी निकाली काढली. बीसीसीआयने आयपीएलचे सामने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. बीसीसीआयने आयपीएल सामने पुढे ढकलले आहेत. त्यामुळे याचिकाकर्तीचा याचिका दाखल करण्याचा हेतू साध्य झाला आहे, असे म्हणत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.

मुंबईत आयपीएलचे सामने होऊ नये, हीच चिंता याचिकाकर्तीला होती. त्यांचा हेतू साध्य झाला आहे. जर दोन महिन्यांनी स्थिती सुधारली तर ते सामने आयोजित करू शकतात. तुम्ही पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करू शकता. त्यासाठी आम्ही याचिका प्रलंबित ठेवण्याची आवश्यकता नाही. आता या याचिकेत तथ्य नाही, असे सांगत  न्यायालयाने याचिका निकाली काढली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे सामने रद्द करा किंवा पुढे ढकलण्याचे आदेश बीसीसीआयला द्यावेत, अशी जनहित याचिका वकील वंदना शहा यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच नुकसानभरपाई म्हणून बीसीसीआयला १००० कोटी रुपये भरण्याचे व नफ्यातील काही भाग कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी खर्च करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.

टॅग्स :आयपीएल २०२१उच्च न्यायालय