Join us

१४ वर्षांच्या हिंदू मुलीचा ताबा मानलेल्या मुस्लिम आईकडे! हायकोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 9:42 PM

जन्मदात्रीने जन्मताच वाऱ्यावर सोडले

मुंबई: जन्मदात्या आईने जन्मानंतर लगेचच वाऱ्यावर सोडून दिलेल्या एका १४ वर्षाच्या हिंदू मुलीचा ताबा मुंबई उच्च न्यायालयाने तिचा सांभाळ आजवर ज्यांनी केला त्या मुस्लिम कुटुंबाकडे पुन्हा दिला आहे. जन्मदात्या आईचे चालचलन चांगले नसल्याचे आरोप व तिच्याकडे न जाण्याचा मुलीचा ठाम निर्धार लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला.‘अनिता’ (नाव काल्पनिक) नावाच्या या हिंदू मुलीला जन्मदात्या आईने सोडून दिल्यापासून तिचा सांभाळ मुंबईत ताडदेव भागातील एम. पी. मिल कम्पाऊंडमध्ये राहणाºया अब्दुल वाहीद अन्सारी यांच्या कुटुंबाने केला. अनिता शाळेत जाते व अभ्यासाखेरीज अन्य गोष्टींतील हुशारीमुळे तिने पारितोषिकेही मिळविली आहेत. अनिताला कळू लागल्यापासून ती अब्दुल व संजिदा खातून या अन्सारी दाम्पत्यासच आपले आई-वडील मानत आली आहे. तसेच अन्सारी यांची झाहिर व शाहीद ही दोन मुले तिचे भाऊ आहेत.अनिताची जन्माची आई हल्ली कानपूरमध्ये राहते. मध्यंतरी दोन वेळा तिने मुंबईत येऊन अनिताला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले आणि डांबून ठेवले. तिने अन्सारी कुटुंबियांविरुद्ध ताडदेव पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यात अनितावर लैंगिक अत्याचारांसह तिच्यावर मुस्लिम संस्कार करणे यासारखे आरोप केले गेले. या भांडणात प्रकरण जिल्हा बाल कल्याण समितीकडे गेले व समितीच्या आदेशाने अनिताला दोन महिने उमरखाडी येथील बालसुधारगृहात राहावे लागले.अन्सारी कुटुंबाने लहानपणापासून अनिताचे पालकत्व स्वत:हून स्वीकारून तिचे इतकी वर्षे संगोपन केले. अनिताही आपल्याच कुुटुंबाला स्वत:चे कुटुंब मानत असली तरी, मध्यंतरीच्या काळाचा अनुभव लक्षात घेता, तिचे कायदेशीर पालकत्व मिळावे यासाठी अन्सारी कुटुंबाने ‘गार्डियनशिप अ‍ॅण्ड वॉर्ड््स अ‍ॅक्ट’नुसार उच्च न्यायालयात याचिका केली.याचिका प्रथम सुनावणीस आली तेव्हा न्या. गौतम पटेल यांनी एकूण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनिताला कोर्टात बजर करण्याचा आदेश दिला. तेव्हापासून त्यांनी तिच्याशी स्वत: बोलून तिचे मत जाणून घेतले. कदाचित आपल्याशी बोलताना तिला संकोच वाटेल हे लक्षात घेऊन त्यांनी न्यायालयातील दोन महिला अधिकाºयांना तिच्याशी बोलून तिने जे सांगितले ते लेखी घेऊन ते सीलबंद लिफाफ्यात ठेवले. या प्रत्येक वेळी अनिताने आपल्याला जन्मदात्या आईकडे मुळीच जायचे नाही, याचाच ठामपणे पुनरुच्चार केला.याचिकेत अनिताची जन्मदाती आई प्रतिवादी असल्याने तिला नोटीस काढून तिचेही म्हणणे ऐकून घेणे भाग होते. त्याप्रमाणे न्यायालयाने तिला नोटीस काढली. पण तिने किंवा तिच्या वकिलाने नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत अनिताचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाल्यावर हे प्रकरण ऐकण्यासाठी हजर राहणारी एक महिला वकील पुढे आली. तिने अनिताला आपल्या घरात आसरा देण्याची हमी दिली. त्यानुसार न्या. गौतम पटेल यांनी अनिताला त्या वकिलाच्या घरी पाठविले. ४ जुलैपासून अनिता तिच्याच घरी राहात होती.दि. २४ जुलै रोजी प्रकरण पुन्हा सुनावणीस आले तेव्हा जन्मदात्या आईच्या वतीने एक वकील कोर्टात उभा राहिला. त्याने उत्तराचे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ मागितला. तो देण्यापूर्वी न्या. पटेल यांनी पुन्हा एकदा अनिताशी बोलून तिचे मत घेतले. ती अन्सारी कुटुंबासोबतच राहण्यावर ठाम होती. त्या महिला वकिलाने कितीही माणुसकी दाखविली तरी तिच्यावर आणखी भार टाकणे योग्य नाही, असा विचार न्या. पटेल यांनी केला व न्यायालयातच अनिताचा ताबा पुन्हा अन्सारी कुटुंबाकडे दिला. अनिताचे हित सर्वोपरी मानून आपण हा आदेश देत आहोत, असे त्यांनी नमूद केले. याचिकेवर अंतिम निकाल होईपर्यंत ती तेथेच राहील.-----------------------पोलिसांना मनाईअनिताला शाळा व क्लासच्या निमित्ताने घराबाहेर जावे लागणार असल्याने ताडदेव पोलिसांनी तिच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे. तसेच कोणीही कोणतीही फिर्याद नोंदविली तरी पोलिसांनी त्याची दखल घेऊन कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश दिला गेला. बाल सुधार समितीसही अनिताच्या प्रकरणात काहीही करण्यास मज्जाव करण्यात आला. 

टॅग्स :हिंदूमुस्लीममुंबई हायकोर्ट