मुंबई : समाजाचे भले करण्यासाठी जनहित याचिका दाखल करत असल्याचा दावा करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला खरोखरचे सामाजिक कार्य करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्या सामाजिक कार्यकर्त्याला त्याचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी एक आठवडा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
एक खासगी कंपनी जागेचा गैरवापर करत आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका दाखल करणारे राकेश चव्हाण यांना मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग व भारती डांगरे यांच्या खंडपीठाने समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचे काम अविरतपणे करणारे अफ्रोज शहा यांच्याबरोबर समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा आदेश दिला. २ सप्टेंबरपासून पुढील एक आठवडा अफ्रोज शहा त्यांना जे काम देतील ते त्यांनी करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
खासगी कंपनी नेस्को, राज्य सरकार आणि सरकारचे वेगवेगळे विभाग संगनमताने जमिनीचा गैरवापर करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले.नेस्को कंपनीचे मालकी हक्क असलेल्या जागेवर पूर्वी विहीर आणि तळे होते. सध्या नेस्को या जागेचा बेकायदेशीरपणे वापर करत आहे. त्यामुळे नेस्को आणि संबंधित प्रशासनाला या जागा पूर्वस्थितीत आणण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती चव्हाण यांनी न्यायालयालाकेली.नेस्कोचे वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी न्यायालयाला सांगितले की, सदर भूखंड १९७० मध्ये सर्व नियमांच्या अधीन राहून खरेदी करण्यात आला आहे. कंपनीने या जागेची तपासणी केली असता या ठिकाणी विहीर असल्याचे सिद्ध झाले. मात्र, ती विहीर ४०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, असे समजले.
याचिकाकर्ता हा याचिकांवर याचिका दाखल करत असतो. कोणतेही खासगी बांधकाम उभे राहत असले की याचिकाकर्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करतो. नेस्को सध्या त्या भूखंडावर असलेले एक्झिबिशन हॉल पाडून नवा हॉल बांधत आहे, असे ढाकेफाळकर यांनी न्यायालयाला सांगितले.त्यानंतर याचिकाकर्त्यांनी हे सर्व आपण समाजाच्या भल्यासाठी करत आहोत, असे न्यायालयाला सांगितले. त्यांच्या या विधानाची दखल घेत न्यायालयाने म्हटले की, तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करायचे आहे तर मग तुम्ही खरेखुरे समाजकार्य करा. एक आठवडा समुद्रकिनारा स्वच्छ करा किंवा अफ्रोज शहा देतील ते काम करा.
अफ्रोज शहा यांच्या कामाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ २०१७ या कार्यक्रमात शहा आणि त्यांच्या चमूची समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या कामाची स्तुती केली होती. शहा यांना ‘युनायटेड नेशन्स एन्वॉयरोन्मेंट प्रोग्रॅम (यूएनईपी) ने ‘चॅम्पियन आॅफ दी अर्थ’ या पुरस्काराने सन्मानितही केलेआहे.‘खात्री करण्याचे दिले निर्देश’याचिकाकर्ते २ सप्टेंबर रोजी अफ्रोज शहा यांच्या कार्यालयात जातील आणि त्यांनी दिलेले काम करतील, याची खात्री करा, असे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.