सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:59 PM2024-10-22T17:59:13+5:302024-10-22T17:59:46+5:30
१०० कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे.
Sachin Vaze ( Marathi News ) : वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला आज मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. वाझे या कोर्टाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र सचिन वाझेविरोधात अन्य प्रकरणातही गुन्हा दाखल असल्याने त्याची तूर्तास तुरुंगातून सुटका होऊ शकणार नाही.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्काली मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप लावला होता. याप्रकरणी देशमुख यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र काही काळानंतर अनिल देशमुख यांची या प्रकरणात जामिनावर सुटका झाली. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळालेला असल्याने मलाही जामीन मिळावा, अशी मागणी करत वाझे याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर याप्रकरणी आज कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, सचिन वाझे याच्यावर अँटेलिया स्फोटक प्रकरणातही गंभीर आरोप आहेत. याप्रकरणातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असून एनआयएकडून तपास सुरू आहे. त्यामुळे १०० कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे.