जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मार्ग उच्च न्यायालयाने केला मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:20 AM2018-10-26T06:20:16+5:302018-10-26T06:20:26+5:30
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून ८.९९ टीमसी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला.
मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून ८.९९ टीमसी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकांवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
‘आम्ही तातडीने या याचिकांवर सुनावणी घेऊ शकत नाही’, असे न्या. भूषण गवई व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटले. महामंडळाने दोनच दिवसांपूर्वी जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिकमधील चार धरणांचे पाणी जायकवाडीकडे वळते करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला नाशिकच्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले असून हे धरण भरल्यानंतर ते पाणी पुढे सोडण्यात येणार आहे. तर मुळा धरणातून पाणी सोडण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. नाशिकच्या दारणा धरणावरही आंदोलन करण्यात आले.