Join us  

राबिया खानच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

By admin | Published: February 02, 2017 3:31 AM

जिया खान आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करून, तपासात एफबीआयचेही सहाय्य घ्यावे, यासाठी जिया खानची आई राबिया

मुंबई : जिया खान आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करून, तपासात एफबीआयचेही सहाय्य घ्यावे, यासाठी जिया खानची आई राबिया खानने केलेल्या याचिकेवरील निर्णय बुधवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला. स्थानिक पोलिसांनी त्यानंतर सीबीआयनेही जिया खानची हत्या करण्यात आली नसून, तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढल्याने, राबिया खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. राबिया खान यांनी केलेल्या याचिकेनुसार, जियाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आली आहे. जिया खानचा शवविच्छेदन अहवाल तीन वेगवेगळ्या खासगी डॉक्टरांना दाखवण्यात आला. या तिन्ही डॉक्टरांनी तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आली आहे, असा निष्कर्ष काढला आहे.त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्त करण्यात यावी व जिया यूएसची नागरिक असल्याने, तपासकामी एफबीआयचे सहाय्य घेण्याचे निर्देश एसआयटीला द्यावेत, अशी मागणी राबिया यांनी याचिकेद्वारे केली आहे.सीबीआयने सर्व बाजूंचा विचार करून, तपास करण्यात आल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. ‘राबिया खान यांनी उपस्थित केलेल्या शंकांच्या दिशेनही तपास करण्यात आला. मात्र, आत्तापर्यंत एकच निष्कर्ष निघाला आहे. जियाची हत्या करण्यात आली नसून, आत्महत्या करण्यात आली आहे,’ असे सीबीआयने उच्च न्यायालयाला सांगितले.जिया खान आत्महत्येप्रकरणी सीबीआयने अभिनेता सूरज पांचोली याच्यावर, जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे. मात्र, राबियांना जियाची हत्या सूरजने केल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)