कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबाबत न्यायालयीन लढाई; लोकसहभाग, लोकवर्गणीचे आवाहन
By जयंत होवाळ | Published: December 22, 2023 07:23 PM2023-12-22T19:23:58+5:302023-12-22T19:24:27+5:30
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे.
जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड बंद करावे यासाठी विक्रोळी विकास मंचातर्फे सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी लोकसहभाग आणि लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले आहे. डम्पिंग ग्राउंड बंद करावे यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे.
भांडुप, विक्रोळी आणि कांजूरमार्ग या तीन विभागांच्या मध्ये हे डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आले आहे. डम्पिंग ग्राउंडला स्थानिकांचा सुरुवातीपासून विरोध होता. सुरुवातीला राजकीय पक्षांनी डम्पिंग ग्राउंड विरोधात भूमिका घेतली. डम्पिंग ग्राउंड सुरु होण्यापूर्वी आणि सुरु झाल्यानंतर काही काळ आंदोलने झाली. मोर्चे काढण्यात आले. नंतर मात्र सगळ्याच पक्षांच्या विरोधाची धार कमी झाली. मात्र स्थानिक जनतेने लढा सुरूच ठेवला आहे. विक्रोळी विकास मंचाच्या माध्यमातून हा लढा दिला जात आहे. प्रख्यात वकील अभिजित राणे स्वखर्चाने न्यायालयीन लढाई लढत आहेत. मात्र कागदपत्र तयार करणे, झेरॉक्स प्रति काढणे, कागदपत्रांचे संच विविध संबंधित पक्षकारांना पाठवणे यासारखी अनेक कामे खर्चिक आहेत. कुणा एकाच्या खांद्यावर हा आर्थिक भर टाकून न्यायालयीन लढा देणे अवघड आहे. त्यामुळे आता या कामासाठी लोकवर्गणीचे आवाहन केले जात आहे. स्थानिक लोक यथाशक्ती वर्गणी देत आहेत. मात्र हा ओघ आणखी वाढणे आवश्यक आहे.
प्रदीर्घ न्यायालयीन लढाई अपेक्षित
उच्च न्यायालयात खटल्याचा निकाल विक्रोळी विकास मंचच्या बाजूने लागला, तर मुंबई महापालिका साहजिकच सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. सर्वोच्च न्यायालयात खटला चालवणे खूपच खर्चिक असते. या न्यायालयातील वकिलांचे शुल्कही तगडे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधीची गरज भासणार आहे. प्रदीर्घ न्यायालयीन लढा लढण्याची वेळ आल्यास निधी कमी पडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे . त्यामुळे पुढील लढाईची भिस्त लोकवर्गणीवर असेल. त्यासाठीच लोकसहभाग आणि लोकवर्गणी आवश्यक आहे.
दुर्गंधी कायम
डम्पिंग ग्राउंडमधून सातत्याने येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तक्रार केल्यास डम्पिंग ग्राउंडवर सुगंधी द्रव्याची फवारणी करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र पुन्हा दुर्गंधी सुरु होते. डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीचे असेल, दुर्गंधी येणार नाही, कचऱ्यातून वीज निर्मिती होईल, अशी भरमसाठ आश्वासने पालिकेने दिली होती. मात्र ती केव्हाच हवेत विरली आहेत.