Join us

हायकोर्टातील वकीलच करत होता ड्रग्जची ‘प्रॅक्टिस’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 5:52 AM

मुंबईतील रॅकेटचे कनेक्शन कोल्हापूरपर्यंत, फार्म हाऊसमधून दोन कोटींचा माल जप्त

ठळक मुद्देगुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एएनसीच्या वांद्रे युनिटने काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात क्रिस्टिना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन (३५) या महिलेला ५० ग्रॅम एमडीसह अटक केली होती.

मुंबई : मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाचा थेट संबंध आता कोल्हापुरातील ढोलगरवाडीपर्यंत (ता. चंदगड) पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे उच्च न्यायालयातील राजकुमार राजहंस या वकिलानेच ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला होता. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने त्याच्या गावातील फार्म हाऊसवर छापा टाकत २ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एएनसीच्या वांद्रे युनिटने काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात क्रिस्टिना मॅगलीन ऊर्फ आयेशा ऊर्फ सिमरन (३५) या महिलेला ५० ग्रॅम एमडीसह अटक केली होती. तिच्या चौकशीदरम्यान हे ड्रग्ज ढोलगरवाडीतून आले असून यामागे ‘राजहंस’चा हात असल्याचे समोर येताच, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी राजहंसच्या फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून राजहंसचा प्रकार उघड झाला. राजकुमारच्या मालकीच्या असलेल्या फार्म हाऊसवर त्याने ड्रग्ज फॅक्टरी तयार करीत हा व्यवसाय सुरू केला होता. राजहंसचा शोध सुरू असल्याचे उपायुक्त नलावडे यांनी सांगितले. 

२ ते ३ वर्षांपासून सुरू होता काळा धंदाअंधेरीचा रहिवासी असलेला राजहंस याचे अंधेरीतच कार्यालय आहे. त्याने एका नायजेरियनकडून एमडी बनविण्याचे प्रशिक्षण घेत, स्वतःच ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला होता. मुंबईतून स्वत:च्या गाडीतून साहित्य घेऊन तो गावाला जायचा आणि तिकडे निखिलच्या मदतीने आवश्यकतेनुसार ड्रग्ज बनवायचा आणि मुंबईत आणून वितरित करायचा. गेल्या २ ते ३ वर्षांपासून त्याचा हा व्यवसाय सुरू होता. 

फार्म हाऊसवर ड्रग्जची फॅक्टरीगुन्हे शाखेच्या तीन पथकांनी तपास करताना मंगळवारी ढोलगरवाडी येथील राजहंसच्या फार्म हाऊसवर छापा टाकला. छाप्यादरम्यान फार्म हाऊसआड सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी गुन्हे शाखेच्या नजरेत पडली. एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी मशिनरी, ड्रायर आणि इतर साहित्य जप्त करून ३८ किलो ७०० ग्रॅम एमडी ड्रग्स बनविण्याचा कच्चा माल तसेच १२० ग्रॅम एमडी असा एकूण २ कोटी ३५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

टॅग्स :उच्च न्यायालयअमली पदार्थ