Join us

चाैकोनी कुटुंबामुळे वृद्धांचे हाल, संयुक्त कुटुंब पद्धतीच्या ऱ्हासावर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:50 PM

Family: संयुक्त कुटुंब पद्धती ढासळल्याने घरातील वृद्धांची काळजी त्यांचे नातेवाईक घेत नाहीत. वृद्धत्व एक मोठे सामाजिक आव्हान बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे

मुंबई - संयुक्त कुटुंब पद्धती ढासळल्याने घरातील वृद्धांची काळजी त्यांचे नातेवाईक घेत नाहीत. वृद्धत्व एक मोठे सामाजिक आव्हान बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने वृद्ध महिलेचे घर तिच्या मुलाला व सुनेला रिकामे करण्याचे आदेश दिले.

अनेक वृद्धांना विशेषतः विधवा महिलांना त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ एकट्याने घालवावी लागत आहे. त्यांच्या भावना विचारात घेतल्या जात नाहीत. त्यांना शारीरिक आणि आर्थिक पाठबळ दिले जात नाही, असे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठाने नोंदविले. 

सप्टेंबर २०२१ मध्ये दिनेश चंदनशिवे यांना उपविभागीय अधिकारी व ज्येष्ठ नागरिक देखभाल न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांनी त्यांची वृद्ध आई लक्ष्मी चंदनशिवे यांच्या मालकीचे निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश दिले. या निर्णयाला दिनेश यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. लक्ष्मी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीचा २०१५ मध्ये मृत्यू झाल्यानंतर मुलाने आणि सुनेने त्यांच्या घरी मुक्काम केला. त्यांनी घर सोडण्यास नकार दिला. उलट, त्यांनी आईची छळवणूक केली आणि तिला ते घर सोडण्यास भाग पाडले. त्या सध्या ठाणे येथे मोठ्या मुलाच्या घरी राहत आहेत. न्यायालयाने दिनेश यांची याचिका फेटाळत त्यांना १५ दिवसांत पत्नीसह आईचे घर खाली करण्याचे आदेश दिले. 

 स्वतःच्या मुलांनी नाकारल्याने मानसिक आघात होतो. कोणत्याही पालकांना असा त्रास दिला जाऊ शकत नाही. एखाद्याच्या आयुष्यात भौतिक गोष्टींपेक्षा बरेच काही आहे.  एखाद्या मुलाला सर्व आघाड्यांवर स्वतःच्या बळावर यश मिळेल आणि तो पालकांच्या संपत्ती व पैशांकडे ढुंकूनही पाहणार नाही, अशा मुलाचा पालकांना नक्कीच अभिमान वाटेल.  न्यायालयांत पोहोचलेल्या याचिकांवरून दिसते की, जग आदर्शवादी नाही. मानवी लोभ हा अथांग मोठा खड्डा आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. ही एका दुर्दैवी आईची गाथा आहे...  ही एका दुर्दैवी आईची गाथा आहे. आईला तिच्याच घरातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी घरातून हाकलल्यानंतर तिला मुलगा व सुनेविरोधात तक्रार करावी लागली. पतीच्या निधनानंतर सरत्या वयात मुलाकडून प्रेम, काळजी, सहानुभूती मिळण्याऐवजी आईला कायदेशीर कारवाई करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.पालकांच्या हयातीत संपत्तीवर दावा कसा? संबंधित घर हे पालकांचे असल्याने त्या घरावर आपला अधिकार आहे, असा दावा मुलाने केला. मात्र, न्यायालयाने त्याचा दावा फेटाळला. पालकांच्या हयातीत मुले त्यांच्या संपत्तीवर दावा करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :ज्येष्ठ नागरिकमुंबई हायकोर्ट