Join us

पालकांची छळवणूक करणाऱ्या मुलाला घर सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:08 AM

मुंबई : पालकांची छळवणूक करणाऱ्या मुलाला त्याच्या पत्नीसह एका महिन्यात घर सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. आई-वडिलांना त्रास देऊन ...

मुंबई : पालकांची छळवणूक करणाऱ्या मुलाला त्याच्या पत्नीसह एका महिन्यात घर सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. आई-वडिलांना त्रास देऊन त्यांचे घर खाली करण्यास मुलगा नकार देत होता. ९० वर्षाच्या वडिलांचा तर ८९ वर्षीय आईचा छळ त्यांच्याच एकुलत्या एक मुलाकडून आणि त्याच्या पत्नीकडून होत असल्याचे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या एकल खंडपीठाने नोंदवले.

न्यायालयाने म्हटले की, पालकांना त्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि स्वतःची मुले करत असलेल्या छळवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात यावे लागत आहे. ‘वृद्ध आई-वडिलांचा एकुलत्या एक मुलाच्या आणि सुनेच्या हातून छळ होत असल्याचे पाहून असे दिसते की, मुलगी ही कायमची मुलगी असते आणि मुलगा हा त्याचा विवाह होईपर्यंत मुलगा असतो’, या जुन्या म्हणीत तथ्य आहे. या म्हणीला निश्चितच काही अपवाद असतील, असेही न्यायालयाने म्हटले.

याप्रकरणी मुलगा जाणुनबुजून वृद्ध आई-वडिलांना सामान्य आयुष्य जगू देत नाही, हे दुःखद आहे. ज्येष्ठ नागरिक सामान्य आयुष्य जगतील, याची खात्री करण्याची जबाबदारी मुले अथवा नातेवाईकांची आहे, असेही न्यायालयाने म्हटले. ज्येष्ठ नागरिकांच्या मालकीच्या घरात राहून त्यांच्या मुलांच्या आणि नातेवाईकांच्या हातून होणाऱ्या छळवणुकीपासून संरक्षण करणे, हे संबंधित कायद्याच्या कार्यक्षेत्रात येते, असे न्यायालयाने म्हटले.

ज्येष्ठ नागरिक लवादाने मुलाला घराबाहेर जाण्याचे आदेश दिले. या आदेशाला मुलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. लवादानेही मुलगा पालकांची छळवणूक करत असल्याचे आदेशात म्हटले आहे. मुलाचे नवी मुंबई आणि दहिसरमध्ये तीन फ्लॅट असतानाही मुलगा आई-वडिलांच्या फ्लॅटमध्ये राहण्याचा आग्रह करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आले. न्यायालयाने मुलाचा युक्तिवाद फेटाळत त्याला ३० दिवसांत पालकांचे घर खाली करण्याचा आदेश दिला.