महिलेवरील गुन्हा रद्द
लॉकडाऊनवरून ट्विट करणाऱ्या महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा
महिलेवरील गुन्हा रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान वांद्रे टर्मिनसवर सर्व स्थलांतरित जमा झाल्याबद्दल नवी मुंबईतील एका महिलेने केलेले ट्विट कोणत्याही चुकीच्या कृत्याला मान्यता देणारे नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्या महिलेवरील गुन्हा बुधवारी रद्द केला.
बीकेसी सायबर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवी मुंबईच्या सुनैना होले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. एस.एस. शिंदे व न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खडपीठाने बुधवारी निकाल देत होले यांच्यावरील गुन्हा रद्द केला.
स्थलांतरितांबाबत ट्विट करून विशिष्ट समुदायाचा अपमान केल्याबद्दल आयपीसी १५३ (अ) अंतर्गत होले यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, होले यांच्या ट्विटमध्ये कोणत्याही एका समाजाचे नाव घेण्यात आले नाही. त्यांच्या त्या ट्विटमुळे समाजामध्ये तेढ निर्माण झाली नाही. कोणत्याही विवेकी व्यक्तीला होले यांचे ट्विट दाखवले तर त्याला त्यात चुकीचा हेतू आढळणार नाही, असे न्यायालयाने होले यांच्या बाजूने निकाल देताना म्हटले.
राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील मनोज मोहिते यांनी होले यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. “पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचे आम्ही कौतुक करतो. मात्र, सदर प्रकरणी कोणताही गुन्हा घडल्याचे दिसत नाही, त्यामुळे गुन्हा रद्द करण्यास हे योग्य प्रकरण आहे,” असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
...............................