Join us

वांद्रे कब्रस्तानमध्ये शव पुरण्यास मनाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:24 AM

मुस्लीम कब्रस्तानच्या भोवती राहणाऱ्या काही रहिवाशांनी कब्रस्तानात कोरोना पीडितांचे शव पुरण्यास परवानगी देऊ नये

मुंबई : कोरोनाच्या पीडितांचे शव ‘वांद्रे कब्रस्तान’मध्ये पुरण्यासाठी मुंबई महापालिकेने दिलेल्या परवानगीवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. वांद्रे येथील कोकणी मुस्लीम कब्रस्तानच्या भोवती राहणाऱ्या काही रहिवाशांनी कब्रस्तानात कोरोना पीडितांचे शव पुरण्यास परवानगी देऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात याचिका धाव घेतली. न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्यापुढे या याचिकेवर सुनावणी होती.कोरोना पीडितांचे शव व्यवस्थित न पुरल्यास आजुबाजूच्या परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशी भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.शवांची विल्हेवाट योग्य रीतीने करण्यात येत आहे. तसेच शवांमुळे कोरोनाची लागण होते, असा कोणताही वैज्ञानिक तर्क याचिककर्त्यांनी सादर केला नाही, असा युक्तिवाद कब्रस्तानच्या विश्वस्त मंडळातर्फे अ‍ॅड प्रताप निंबाळकर यांनी न्यायालयात केला.केंद्र सरकारने काढलेल्या १५ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेकडे निंबाळकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मृत शरीर व्यवस्थापन विषयक मार्गदर्शक सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत. यानुसार शवाची विल्हेवाट लावताना योग्य ती खबरदारी घेतल्यास शवातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे, असे या अधिसूचनेत म्हटले आहे, असे निंबाळकर यांनी न्यायालयाला सांगितले.याचिककर्त्यांनी त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ एकही पुरावा सादर केली नाही, असे म्हणत न्यायालयाने याचिककर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तर महापालिकेला या कब्रस्तानाला लावण्यात आलेली तीन टाळी उघडण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस