पेंटिंग्जचा लिलाव रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:40 AM2020-03-05T05:40:36+5:302020-03-05T05:40:47+5:30

आरोपी नीरव मोदी याच्याकडून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या दुर्मीळ पेंटिंग्जच्या लिलावाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. हा लिलाव येत्या शुक्रवारी होणार आहे.

High court refuses to cancel auction of paintings | पेंटिंग्जचा लिलाव रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पेंटिंग्जचा लिलाव रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Next

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील फरार असलेला आरोपी नीरव मोदी याच्याकडून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या दुर्मीळ पेंटिंग्जच्या लिलावाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. हा लिलाव येत्या शुक्रवारी होणार आहे. या पेंटिंग्जचा लिलाव करण्यात येऊ नये, यासाठी नीरव मोदी याचा मुलगा रोहीन मोदी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी प्रभारी मुख्य न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे होती.
लिलावात काढण्यात येणाऱ्या पेंटिंग्ज नीरव मोदी यांच्या मालकी हक्काच्या नसून त्या रोहीन ट्रस्टच्या आहेत, असे रोहीन मोदी याने याचिकेत म्हटले आहे. रोहीन मोदी गुन्हेगार नसल्याने त्याच्या ट्रस्टच्या पेंटिंग्जचा लिलाव करता येणार नाही, असा युक्तिवाद रोहीन मोदी याच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात केला.
ईडीतर्फे ज्येष्ठ वकील अनिल सिंग आणि हितेन वेणेगावकर यांनी त्यावर आक्षेप घेतला. ‘रोहीन मोदी, नीरव मोदी आणि त्याची पत्नी या ट्रस्टचे लाभार्थी आहेत. मार्च २०१९ मध्ये ईडीने या पेंटिंग्ज ताब्यात घेतल्या आणि लिलावासंदर्भात जानेवारी २०२० मध्ये जाहिरात दिली,’ असे ईडीने न्यायालयाला सांगितले.
याचिकाकर्ता (रोहीन मोदी) ऐनवेळी न्यायालयात आला. रोहीन ट्रस्ट किंवा या ट्रस्टचे अन्य लाभार्थी नीरव मोदी किंवा त्याची पत्नी न्यायालयात आले नाहीत. न्यायालयात इतक्या विलंबाने येण्याचे स्पष्टीकरण याचिकाकर्ता देऊ शकला नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
‘अशा स्थितीत आम्ही अंतरिम दिलासा देणार नाही. ईडीने २३ मार्च रोजी उत्तर सादर करावे,’ असे म्हणत न्यायालयाने ईडीला पेंटिंग्जचा लिलाव करून मिळणारी रक्कम एका स्वतंत्र बँक खात्यात ठेवण्याचे निर्देश दिले. या याचिकेवर निकाल लागेपर्यंत ती रक्कम कुठेही वळवण्यात येऊ नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
>कोट्यवधीचा गंडा
१५ पेंटिंग्जच्या व्यतिरिक्त हिरेजडित काही घड्याळे, महागड्या परदेशी कार, हर्मीसच्या हँडबॅगचाही लिलाव करण्यात येणार आहे. नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्यावर मनी लाँड्रिंगअंतर्गत गुन्हा नोंदविल्यावर ईडीने मोदीच्या घरातील महागड्या वस्तू जप्त केल्या. पीएनबीला (पंजाब नॅशनल बँक) १३,६०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर आहे.

Web Title: High court refuses to cancel auction of paintings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.