लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०१३ नॅशनल स्पॉट एक्सचेंज लि. (एनएसईएल) घोटाळ्यात आरोपी असलेले व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख याचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने केलेला अर्ज उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला.
योगेश देशमुख याला ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी एप्रिल महिन्यात अटक केली होती. मात्र, विशेष न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. हा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. एस. के. शिंदे यांच्या एकल खंडपीठापुढे सुनावणी होती.
एनएसईएल ५६०० कोटी रुपये घोटाळ्याप्रकरणी विकासक योगेश याला अटक करण्यात आली. देशमुख याचे वकील राजीव चव्हाण आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयाला सांगितले की, देशमुख याला अटक केल्यापासून तपासात कोणतीही प्रगती नाही. देशमुख याने पहिल्यांदा केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. तपास सुरू असल्याने देशमुख याची जामिनावर सुटका केली तर तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, असे विशेष न्यायालयाने देशमुख याचा पहिला जमीन अर्ज फेटाळताना म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा देशमुख याने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला. तपासात कोणतीही प्रगती नाही आणि या प्रकरणातील सहआरोपींना अटकेपासून संरक्षण दिल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने विशेष न्यायालयाने देशमुख याची जामिनावर सुटका केली.
एनएसईला घोटाळ्यात सरनाईक यांना ११ कोटी रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. एनएसईएलला २५० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आस्था ग्रुप आणि सरनाईक यांच्या विहंग ग्रुप या कंपनीने पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. आस्था ग्रुप आणि विहंग ग्रुपने मिळून टिटवाळा येथे शेतकऱ्यांकडून अनेक जमिनी खरेदी केल्या. देशमुख याने शेतकऱ्यांची फसवणूक करून काही जमिनी खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.