लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पोर्नोग्राफिक फिल्म्सची निर्मिती करून तिचे वितरण केल्याप्रकरणी आरोपी असलेला व्यावसायिक व अभनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
राज कुंद्राने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर २९ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने पोलिसांना दिले. राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने २९ जुलै रोजी अटक केली. अटकेनंतर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच कुंद्राच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी ठेवली.
कुंद्रा याच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, कुंद्रा यांची अटक बेकायदेशीर आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नाही. सीआरपीसी कलम ४१ (ए) अंतर्गत कुंद्रा यांना आधी नोटीस बजवायला हवी होती. त्यानंतर त्यांना अटक करायला हवी होती. मात्र, पोलिसांनी नोटीस बजावण्याची कायदेशीर प्रक्रिया डावलून कुंद्रा यांना थेट अटक केली.
मात्र, मुख्य सरकारी वकील अरुणा पै - कामत यांनी हा आरोप फेटाळला. पोलिसांनी कुंद्रा यांना नोटीस बजावूनच अटक केली, असे पै-कामत यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सरकारी वकिलांना या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पोंडा यांनी तोपर्यंत कुंद्राला अंतरिम दिलासा देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली.
सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्याशिवाय एकतर्फी अंतरिम दिलासा देणारी नाही, असे न्या. गडकरी यांनी म्हटले.
पोलीस ज्या गोष्टी पोर्नोग्राफिक असल्याचा दावा करत आहेत त्यामध्ये थेट लैंगिक दृश्ये किंवा शारीरिक संबंध दाखविण्यात आलेले नाहीत. एखाद्या लघुपटात प्रणय दृश्ये दाखविण्यात येतात तशी आहेत. ती दृश्ये पाहणारा फारतर कामातुर होऊ शकतो. त्यामुळे पोलीस माहिती व तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ (ए) आपल्यावर लावू शकत नाहीत. फारतर कलम ६७ (कामातुर कंटेट प्रसिद्ध करणे) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे.
कुंद्राच्या अटकेनंतर क्राईम ब्रँचने कुंद्रा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. कुंद्राच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात ५१ अश्लील व्हिडिओ जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.