लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करून कोर्ट रुममध्ये मास्क न घालणाऱ्या वकिलाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. सध्या मुंबईत व उर्वरित राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत आहे.
उच्च न्यायालयाने लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करताना कार्यप्रणाली ठरवली होती. त्यानुसार, कोर्टरूममध्ये वकिलांनी युक्तिवाद करतानाही मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
२२ फेब्रुवारी रोजी एका प्रकरणातील वकिलाने वेळेपूर्वी कोर्टरूममध्ये प्रवेश केला व कोर्टरूममध्ये आल्यानंतर त्याने मास्क काढले. त्यामुळे त्याची याचिका पटलावरून हटवण्यात आली, असे न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एक्स सदस्यीय खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने आखलेल्या कार्यप्रणालीनुसार, एकावेळी एकाच प्रकरणातील वकील कोर्टरूममध्ये उपस्थित राहतील. त्यांचे कनिष्ठ सहकारी व आशील आवश्यकता असेल तरच कोर्टरूममध्ये उपस्थित राहतील. सर्वजण मास्कचा वापर करतील आणि युक्तिवाद करतानाही वकील मास्क काढणार नाहीत. तसेच सामाजिक अंतरही पाळावे लागेल.