मुंबई : पत्नी बारमध्ये काम करत असल्याने तिच्या व्यवसायाचा वाईट प्रभाव मुलीवर पडू नये, यासाठी मुलीचा ताबा पत्नीकडे न देता आपल्याकडे द्यावा, अशी विनंती करणारी याचिका एका पित्याने उच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने पित्याची याचिका फेटाळली.घटस्फोट घेतलेल्या पत्नीकडून साडेचार वर्षांच्या मुलीचा ताबा मिळावा, यासाठी पतीने उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस (हरवलेल्या व्यक्तीला हजर करा) याचिका दाखल केली.२०१४ मध्ये त्याने संबंधित महिलेशी विवाह केला. विवाहादरम्यान तिच्या पालकांनी आपली मुलगी हे काम सोडून चांगले काम स्वीकारेल, असे आश्वासन दिले. या आश्वासनावरच तिच्याशी विवाह केला, असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे.मात्र, पती-पत्नीमधील वादामुळे पत्नीने साडेचार वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन २०१७ मध्ये पतीचे घर सोडले आणि पुन्हा बारमध्ये काम करू लागली, असे याचिकेत म्हटले आहे.माझ्या मुलीचे भविष्य पणाला लागले आहे. तिच्या आईच्या व्यवसायामुळे मुलीच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तिचा ताबा मला द्यावा, अशीविनंती याचिकाकर्त्याने न्यायालयाला केली.मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळली. ‘पत्नीच्या जोडधंद्याविषयी पतीला काहीच माहीत नव्हते, अशी केस नाही. तसेच मुलीचा ताबा बेकायदेशीरपणे तिच्या आईकडे देण्यात आला, असेही कुठे निदर्शनास आले नाही,’ असे निरीक्षण नोंदवत न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.एम. जमादार यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला दिलासा देण्यास नकार दिला.
बारमध्ये काम करणाऱ्या आईपासून मुलीला वेगळे करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 4:16 AM