मुंबई : कन्नड अभिनेत्री व नीरज ग्रोव्हर हत्या प्रकरणातील दोषी मारिया सुसईराज हिने १५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने मंगळवारी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.मारिया आणि प्रोमिता चक्रवर्ती हिच्याविरोधात ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी एका उद्योगपतीला १५ कोटी रुपयांना फसविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. नीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी कारागृहात असताना मारियाची ओळख प्रोमिताशी झाली. या दोघांचा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या दोघींनी एका व्यावसायिकाला ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहण्याने १५ कोटी रुपये उकळल्याचा पोलिसांचा आरोप आहे.पोलिसांचा हा आरोप सुसईराजने फेटाळला आहे. प्रोमिताबरोबर भागीदारीत कधीच व्यवसाय केला नाही. उलट मैसुरमध्ये एक आर्ट टीचर म्हणून मी काम करत आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाला फसविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सुसईराजने अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे.ठाणे पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली तर सुसईराजला फरारी आरोपी म्हणून जाहीर केले. त्यामुळे सुसईराजने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली.उच्च न्यायालयाने तिची बाजू ग्राह्य न धरता तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
अभिनेत्री मारिया सुसईराजचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 5:11 AM