मुंबई : विद्यमान न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. याचिकाकर्त्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.याचिकाकर्त्यांच्या याचिकेत काहीही तथ्य नाही व याचिकेद्वारे केलेल्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत, असे म्हणत न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने व्यवसायाने वकील असलेले उल्हास नाईक यांची याचिका फेटाळली. त्याशिवाय न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.न्या. शिंदे जिल्हा न्यायाधीश असताना जनहितार्थासाठी त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली होती. तसेच त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करणाºया कॉलेजियमपुढे यापूर्वी दोनदा त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.परंतु, दोन्ही वेळेस ती फेटाळण्यात आली होती, असे व्यवसायाने वकील असलेले उल्हास नाईक यांनी याचिकेत म्हटले होते.न्या. संदीप शिंदे यांची नियुक्ती रद्दबातल ठरवावी; तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत त्यांना अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कामकाज पाहू देऊ नये, अशी विनंती उल्हास नाईक यांनी याचिकेद्वारे केली होती.
न्या.संदीप शिंदे यांच्या नियुक्तीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:05 AM