Join us

अण्णा हजारेंना साक्षीदार करण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 5:48 AM

काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची साक्षीदार म्हणून सत्र न्यायालयात साक्ष नोंदविण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

मुंबई : काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची साक्षीदार म्हणून सत्र न्यायालयात साक्ष नोंदविण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. अण्णांची साक्ष या खटल्यात महत्त्वाची आहे, असे सिद्ध करण्यात आले नाही, असे न्यायालयाने सांगितले.सरकारी वकिलांचे साक्षीदार म्हणून अण्णांची साक्ष नोंदविण्यास सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये नकार दिला. त्यास पवनराजे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकेवरील सुनावणी न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे झाली.पवनराजे यांची हत्या करण्याचा कट राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांनी रचल्याची माहिती अण्णा हजारे यांना होती. त्यामुळे ते या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत, असे आनंदीबाई यांनी अर्जात म्हटले आहे. हजारे यांचीही हत्या करण्याचा कट पाटील यांनी रचला होता, असा दावा अर्जात करण्यात आला होता.हजारे यांना प्रत्यक्षात कटाची माहिती होती, असे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नाहीत. या खटल्यात हजारे यांची साक्ष उपयोगी आहे, अशी कोणतीही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आलेली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. हजारे यांना धमकविणे, हा एक स्वतंत्र गुन्हा आहे. या खटल्याशी त्याचा काहीही संबंध नाही, असे न्यायालयाने म्हटले.>हत्येची पार्श्वभूमीनवी मुंबईतील कळंबोली येथे ३ जून, २००६ रोजी निंबाळकर व त्यांच्या ड्रायव्हरची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पाटील यांना अटक केली व त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. लातूरचा व्यावसायिक सतीश मंदादे, नगरसेवक मोहन शुक्ला, पारसमल जैन, माजी राज्य महसूल निरीक्षक शशिकांत कुलकर्णी, बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता कैलाश यादव, तसेच शार्प शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे हे या प्रकरणातील आरोपी आहेत.

टॅग्स :अण्णा हजारे