दीपक कोचर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:14+5:302021-03-26T04:07:14+5:30
व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपी असलेले दीपक कोचर यांना गुरुवारी ...
व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण :
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्हिडिओकॉन-आयसीआयसीआय आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपी असलेले दीपक कोचर यांना गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोचर हे आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती आहेत.
आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन कर्ज गैरव्यवहारप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये काेचर काेचर यांना अटक केली. गुरुवारी न्या. प्रकाश नाईक यांनी त्यांना तीन लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर जामीन मंजूर केला. तसेच पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करण्याचे आदेश दिले.
आयसीआयसीआय बँकेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉन समूहाला १,८७५ कोटींचे कर्ज मंजूर केले होते. त्यात त्यांनी पती दीपक कोचर यानं लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात विशेष न्यायालयाने कोचर यांचा जामीन अर्ज नाकारल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. कोचर दाम्पत्यावर आणि व्हिडिओकॉन समूहाचे संचालक वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. गेल्याच महिन्यात चंदा कोचर यांना विशेष न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या बॉण्डवर जामीन दिला होता.