मारिया यांना हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: May 1, 2015 02:28 AM2015-05-01T02:28:20+5:302015-05-01T02:28:20+5:30
एका प्रकरणात दोन प्रतिज्ञापत्र सादर करून भिन्न दावे केल्याने मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मॅटने ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड उच्च न्यायालयाने स्थगित केला.
मुंबई : एका प्रकरणात दोन प्रतिज्ञापत्र सादर करून भिन्न दावे केल्याने मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना मॅटने ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड उच्च न्यायालयाने स्थगित केला. तुकाराम डेरे व हरिश्चंद्र थोरात या बडतर्फ पोलीस हवालदारांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मुद्द्यावरून मारिया यांनी मॅटसमोर दोन प्रतिज्ञापत्र सादर केली. एका प्रतिज्ञापत्रात या दोन हवालदारांचा पुन्हा सेवेत घेण्याचा अर्ज गेल्यावर्षीच निकाली काढल्याचे नमूद करण्यात आले तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात सरकारकडे त्यांचा अर्ज प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला. त्यावर संतप्त झालेल्या मॅटने मारिया यांनी २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याविरोधात मारिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी मारिया यांच्याकडून बाजू मांडली. मारिया यांनी याबाबत मॅटकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही त्यांना दंड ठोठावण्यात आला. हे गैर असून हा दंड रद्द करावा, अशी मागणी अॅड. वग्यानी यांनी केली. त्यावर मॅटच्या आदेशाला स्थगिती देत न्यायालयाने ही सुनावणी
सहा आठवड्यांसाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)
च्मारिया यांनी याबाबत मॅटकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही त्यांना दंड ठोठावण्यात आला. हे गैर असून हा दंड रद्द करावा, अशी मागणी अॅड. वग्यानी यांनी केली.