लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपशब्द बोलल्याप्रकरणी माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांच्यावर ११ गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ११ पैकी एकाच गुन्ह्यात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी उच्च न्यायालयाला बुधवारी दिले. त्यामुळे आनंद परांजपे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
अन्य १० प्रकरणांत दोन आठवड्यांत अहवाल सादर करू, अशी माहिती सरकारी न्यायालयाने न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला दिली. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तपास सुरू ठेवण्यास सांगितले. मात्र, पुढील आदेश देईपर्यंत परांजपे यांच्यावर आरोपपत्र दाखल करू नका, असे स्पष्ट पोलिसांना बजावले.