मुंबई : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन याची सुटका करण्यासाठी शाहरूखकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी अधिकारी समीर वानखेडे यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. वानखेडे यांना अटकेपासून दिलेल्या अंतरिम संरक्षणात वाढ करायची की तो आदेश रद्द करायचा, याबाबत निर्णय घेण्यापूर्वी उच्च न्यायालयाने सीबीआयला केस डायरी सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले.
न्या. अजय गडकरी व न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने सीबीआयला २७ जूनपर्यंत केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले. सुनावणी २८ जून रोजी ठेवत न्यायालयाने वानखेडे यांना त्या दिवसापर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षणात वाढ केली. सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी सुट्टीकालीन खंडपीठाने सीबीआयला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही दिले होते. तसेच वानखेडे यांना प्रकरणाशी संबंधित व्हाॅट्सॲप चॅट प्रसिद्ध करू नयेत व प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हायकोर्ट म्हणाले... सीआरपीसी ४१ ए अंतर्गत नोटीस बजावल्यानंतर तुम्ही अटक कसे करू शकता? त्यांना अटक करण्यापूर्वी ४८ तास आधी नोटीस द्याल, अशी हमी द्या. त्यांना अटक करण्याचा तुमचा हेतू आहे की नाही? हे तुम्ही आम्हाला का सांगत नाही? आमच्याबरोबर लपंडाव खेळू नका... आधीच्या खंडपीठाने समीर वानखेडे यांना संरक्षण देऊन योग्य निर्णय घेतला आहे, असे वाटते.