मुंबई : मुंबई मेट्रो-३ ची कारशेड उभारण्यासाठी आरे वसाहतीत आरक्षित केलेल्या ३३ हेक्टर जमिनीवर सध्या उभी असलेली २,७०२ झाडे त्यांचे पूर्ण आयुष्य जगल्याने पर्यावरणाचा जेवढा फायदा झाला असता त्याहूनही ही झाडे तोडून मेट्रो चालविणे अधिक पर्यावरणस्नेही आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.मेट्रो कारशेडसाठी २,७०२ झाडांची कत्तल करण्यास आणि आणखी ४६१ झाडे तेथून उपटून अन्यत्र नेऊन लावण्यास मंजुरी देण्याच्या बृहन्मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळताना दिलेल्या निकालपत्रात मुख्य न्यायाधीश न्या. प्रदीप नांदराजोग व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने या प्रस्तावित वृक्षतोडीविरुद्ध पर्यावरणवाद्यांकडून केली जाणारी ओरड कशी अनाठायी आहे याचे सविस्तर विवेचन केले आहे.न्यायालय म्हणते की, आपल्याला कारशेडसाठी आरे वसाहतीमधील जो भूखंड मिळाला आहे तेथे भरपूर झाडे आहेत व कारशेडचे प्रत्यक्ष काम सुरू करताना त्यात अडथळा ठरणारी झाडे अपरिहार्यपणे तोडावी लागतील, हे गृहित धरून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने याची भरपाई करण्याची तयारी दोन वर्षांपूर्वीपासूनच सुरू केली होती. त्यानुसार कॉर्पोरेशनने आरे वसाहतीत तोडाव्या लागणाºया झाडांच्या सहापट झाडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लावण्याचे स्वत:हून ठरविले आहे. यापैकी २०,९०० झाडे याआधीच लावून झाली असून आणखी ११,४०० झाडे लावण्यात येतील. लावलेल्या प्रत्येक झाडाला जीपीएस टॅग लावला असून ही झाडे जगण्याचे प्रमाण ९५ टक्के आसल्याचे प्रमाणपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य नवसंरक्षकांनी दिले आहे.झाडे हवेतील कार्बन डायआॅक्साईड शोषून घेऊन आॅक्सिजन बाहेर सोडतात. याउलट रस्त्यावर चालणारी वाहने धुरावाटे कार्बन डायआॅक्साईड सोडून हवा प्रदूषित करतात. हे वास्तव लक्षात घेऊन झाडे तोडून मेट्रो चालविणे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने कसे फायद्याचे आहे याचे गणित न्यायलायने नमूद केले. ते असे : आता तोडली जाणारी २,७०२ झाडे न तोडली नसती तर त्यांनी त्यांच्या अपेक्षित आयुष्यात १२,७९,०६ किलो एवढा हवेतील कार्बन डायआॅक्साईड शोषून घेतला असता. या उलट ही झाडे तोडून मेट्रो चालविली तर येत्या १० वर्षांत पूर्ण भरलेल्या मेट्रोच्या ३,९४८ फेऱ्यांमुळे रस्त्यावर येणाºया वाहनांमध्ये जी घट होईल त्यामुळे या वाहनांमधून हवेत सोडल्या जाणाºया कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण २,६१, ९६८ टन एवढे कमी होईल.कारशेडच्या भूखंडाच्या चतु:सीमांवर असलेली झाडे न तोडण्याचा निर्णयन्यायालयाने असेही नमूद केले की, सुरुवातीस मुंबई मेट्रोने जा प्रस्ताव दिला त्यानुसार आरेमधील एकूण ३,६९१ झाडांवर गंडांतर येणार होते. यापैकी २,२३८ झाडे कापली जायची होती तर ४६४ झाडांचे अन्यत्र प्रत्यारोपण करायचे होते. परंतु कारशेडच्या भूखंडाच्या चतु:सीमांवर असलेली झाडे न ताडण्याचे व प्रत्यारोपण करण्याच्या झाडांची संख्याही वाढवून मेट्रो कॉर्पोरेशनने स्वत:हून ९,८९ झाडांवर येऊ घातलेली कु-हाड वाचविली.
आरेतील झाडे तोडून मेट्रो चालविणे अधिक पर्यावरणस्नेही, हायकोर्टाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 12:42 AM