वकिलाच्या अटकेचे स्पष्टीकरण न दिल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांची काढली खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:10+5:302021-05-18T04:06:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाच्या अटकेबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने उच्च ...

The High Court slammed the police for not giving an explanation for the lawyer's arrest | वकिलाच्या अटकेचे स्पष्टीकरण न दिल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांची काढली खरडपट्टी

वकिलाच्या अटकेचे स्पष्टीकरण न दिल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांची काढली खरडपट्टी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाच्या अटकेबाबत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने उच्च न्यायालयाने पोलिसांची खरडपट्टी काढली.

न्या. शाहरूख काथावाला व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे यासंदर्भात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अटकेतील वकील विमल झा आणि लॉयर्स फॉर जस्ट सोसायटीने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी होती. झा यांना गेल्या महिन्यात बेकायदेशीररीत्या अटक केली. सीआरपीसी व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पोलिसांनी उल्लंघन केले, असे याचिकेत नमूद आहे.

याचिकेनुसार, झा यांना ३ एप्रिलला अटक झाली. मात्र, त्यांना ५ एप्रिलला दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. दंडाधिकारी न्यायालयाने आदेश दिल्याशिवाय आरोपीला न्यायालयात बेड्या घालू नये, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही पोलिसांनी त्याचे उल्लंघन करत न्यायालयातही झा यांच्या हातात बेड्या घातल्या हाेत्या.

मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी हे आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले, झा यांना ४ एप्रिलला अटक करून ५ एप्रिलला न्यायालयात हजर केले. त्यांना ३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात बोलावले होते. ५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता गुन्हा दाखल करून त्यानंतरच अटक केली.

त्यावर न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे मागितले. मात्र, त्यावेळी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही नव्हते, १ मेनंतर सीसीटीव्ही बसवले. तसेच झा फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती सहआरोपीने पोलिसांना दिल्याने त्यांना न्यायालयात आणताना बेड्या घातल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांच्या या युक्तिवादावर न्यायालयाने आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असणे बंधनकारक आहे, याची आठवण करून दिली.

किती पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवले आहेत? एक वकील कारागृहात आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीरपणे घ्या. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यासाठी कोण गेले होते? आमच्यासमोर वारंवार खोटी विधाने का करत आहात? असे सवाल उच्च न्यायालयाने पोलिसांना केले.

झा हे फार मोठे गुन्हेगार आहेत का, म्हणून तुम्ही त्यांना न्यायालयात आणताना बेड्या घातल्यात, असे म्हणत न्यायालयाने आतापर्यंत केलेल्या तपासासंबंधी पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

ठाकरे (सरकारी वकील) तुम्ही तुमचे कर्तव्य न्यायालयाबाहेरही बजावा. प्रतिज्ञापत्र सादर करताना अधिकाऱ्यांना सावध राहायला सांग. जर पोलीस असेच वागत राहिले तर सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणेकडे तपास वर्ग करण्यास आम्हाला भाग पडू नका, अशी तंबी न्यायालयाने दिली.

याचिकेनुसार, झा यांना खारघर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अशिलाने त्यांच्यावर खंडणी उकळण्याचा व अपहरण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली हाेती. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. या याचिकेवर १९ मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

.......................................

Web Title: The High Court slammed the police for not giving an explanation for the lawyer's arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.