Join us

हायकोर्टानं सरकारला चपराक लगावलीय; हफ्तेखोरीचं सत्य आता बाहेर येईल; फडणवीसांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 12:39 PM

Devendra Fadnavis: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलींचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता.

Devendra Fadnavis: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी वसुलींचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!

"पोलिसांना वसुलीचं टार्गेट देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारा प्रकार या सरकारनं केला. प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न झाला. पण हायकोर्टानं सरकारला जोरदार चपराक लगावून याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आता या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आतातरी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या"राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप हे काही आता राज्यातील एका राजकीय पक्षाचे राहिलेले नाहीत. आता कोर्टानंच याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे नैतिकता बाळगून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना चौकशीला सामोरं जाण्याचे आदेश द्यावेत. ते याप्रकरणातून निर्दोष मुक्त झाले की त्यांना खुशाल पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं", असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

मंत्र्यांच्या आशिवार्दानेच वसुली गँग कार्यरत"हफ्ते वसुलीचं काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. सीबीआय चौकशी होऊ नये साठी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला. पण हायकोर्टानं आज कडक भूमिका घेत सरकारला झटका दिला आहे. आता गृहमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. अनिल देशमुखांनी या पदावर राहणं योग्य नाही", असं फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअनिल देशमुखपरम बीर सिंग