लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा सतत सुनावणी स्थगित करण्याची विनंती करत असल्याने उच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना तंबी दिली. ही अखेरची संधी आहे, आणखी एकदा याचिका सुनावणीस स्थगिती मागितली तर त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा न्यायालयाने दिला. हनुमान चालीसा पठण प्रकरणातून आपल्याला आरोपमुक्त करण्यात यावे, यासाठी राणा दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सत्र न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त करण्यास नकार दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करू, असे राणा यांनी जाहीर केल्यानंतर पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना त्यांच्या खार येथील घरातच अडविले. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याने, पोलिसांनी राणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.