मुंबई : शहर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात खड्ड्यांसंदर्भातील मुद्दे उपस्थित करणारी अवमान याचिका निकाली काढण्याच्या विचाराधीन असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आल्याने एकाच मुद्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. त्यामुळे एकच मुद्दा घेऊन या, असे न्यायालयाने म्हटले. प्रत्येक सुनावणीवेळी कोणीतरी हस्तक्षेप याचिका दाखल करतो. त्यामुळे न्यायालय आणि अधिकाऱ्यांना एकाच मुद्यावर लक्ष केंद्रित करणे शक्य नाही, असे मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने म्हटले.
खड्ड्यांसंदर्भात याचिका सुनावणीसाठी येते, तेव्हा किमान १० हस्तक्षेप याचिका दाखल होतात. असेच सुरू राहिले तर दिवसभर हे प्रकरण ऐकले तरी काही होणार नाही. याचिकांवर निकाल देताना न्यायालयाचा वेळ वाया जाईल. अशा स्थितीत सुनावणी घेणे अवघड झाले आहे. आम्ही आणि अधिकारी लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे आम्ही ही कार्यवाही बंद करत आहोत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
नुकसानीसाठी जबाबदार धरले जाऊ शकते
ॲड. रुजू ठक्कर यांनी खड्ड्यांमुळे किती लोकांचा मृत्यू झाली, याची आकडेवारी न्यायालयाला दाखवली. तसेच अनेक याचिका दाखल होत आहेत म्हणून ही कार्यवाही बंद करू शकत नाही.
निर्देशांचे पालन करण्यास अधिकारी जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत, असे ठक्कर म्हणाले. अधिकाऱ्यांवर अवमान होऊ शकत नाही. त्यांना नुकसानीसाठी जबाबदार धरले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले.
तरीही ठक्कर यांनी ही याचिका निकाली न काढण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने काही विशिष्ट मुद्दे असल्यास दाखल करा, असे ठक्कर यांना सांगितले. न्यायालयाने याबाबत लवकरच आदेश देऊ, असे स्पष्ट केले.