Join us

'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल

By दीप्ती देशमुख | Published: October 04, 2023 3:12 PM

ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते.

दीप्ती देशमुख 

मुंबई : नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी, याकरिता एका वकिलाने पत्र लिहिले आहे. न्यायालयाने या पत्राची दखल घेत संबंधित वकिलांना यासंदर्भात याचिका दाखल करण्याचे निर्देश बुधवारी दिले. ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते.

या पत्रात खन्ना यांनी नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 30 सप्टेंबरपासून अर्भकांसह 31 मृत्यू आणि 2 ते 3 ऑक्टोबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात किमान 14 मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी ठाणे महापालिकेच्या नियंत्रणात असलेल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल रुग्णालयात ऑगस्टमध्ये २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचाही उल्लेख केला आहे.

रुग्णालयांनी प्रसारमाध्यमांपुढे केलेल्या विधानात त्यांच्याकडे बेड, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर व अन्य वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचा उल्लेख केला आहे. या सुविधांचा अभाव म्हणजे राज्य घटनेने बहाल केलेल्या जीवन जगण्याचा अधिकाराचे उल्लंघन होय. राज्य सरकार त्यांचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले आहे, असे खन्ना यांनी पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात याचिकादारांनी याचिका दाखल करावी, असे म्हणत उच्च न्यायालयाने खन्ना यांना याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.

काय आहे प्रकरण...!

नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर मंगळवारी अत्यवस्थ असलेल्या आणखी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 8  बालकांचा समावेश आहे. दोन दिवसांत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अत्यवस्थ असलेले 36 शिशुंसह 59 रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. 

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबईहॉस्पिटल