मुंबई : ड्रग माफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकरने पोलीस धाडीमध्ये जप्त केलेली मालमत्ता परत करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने पाटणकरला दिलासा देण्यास नकार देत, ट्रायल कोर्टात अर्ज करण्याचे निर्देश दिले. न्या. रणजीत मोरे व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेणे योग्य नसल्याचे म्हणत, पाटणकरला ट्रायल कोर्टात जाण्याचे निर्देश दिले. मोठ्या प्रमाणावर मेफाड्रोन (एम-कॅट) विकत असल्याने पोलिसांनी बेबी पाटणकरला एप्रिलमध्ये अटक केली. त्यानंतर सत्र न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. पाटणकरच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी धाडीमध्ये तीन कार, २० मोबाइल, ३५ हजार रुपयांची रोकड, बँकेचे कागदपत्र, मालमत्तेचे कागदपत्र पंचनामा न करताच जप्त केले, तसेच वरळी येथील घराच्या बाहेर लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमराही पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व वस्तू परत कराव्यात आणि सीसीटीव्ही कॅमेरा पुन्हा बसवून द्यावा, अशी मागणी पाटणकरने याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली, तसेच जप्त केलेले पदार्थ अंमली पदार्थ आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली, हेसुद्धा पोलिसांना उघड करण्याचा आदेश द्यावा, अशीही मागणी पाटणकरने याचिकेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
हायकोर्टाचा पाटणकरला दिलासा नाही
By admin | Published: December 15, 2015 2:03 AM