मुंबई : कोरोनाच्या काळात आता ग्राहकांच्या घरखरेदीबाबत असणाऱ्या अपेक्षादेखील बदलल्याचे चित्र दिसून येत आहे. ॲनारॉक संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हे बदल दिसून आले आहेत. २०२१च्या जानेवारी ते जून दरम्यान एकूण पाच हजार नागरिकांचे यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार आता भारतातील प्रमुख शहरांमधील ३४ टक्के ग्राहक ९० ते २.५ कोटी दरम्यान किंमत असणारी घरे घेण्याच्या विचारात असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, घरखरेदी करताना घरांच्या आकर्षक किमतीसोबतच मालमत्तेच्या निवडीदरम्यान विकसकांची असणारी विश्वासार्हता सर्वाधिक पहिली जाते. यानंतर प्रकल्पाची रचना, स्थानदेखील मुख्य आकर्षण देखील लक्षात घेतले जाते. यंदा केवळ २७ टक्के ग्राहक परवडणारी घरे घेण्यास इच्छुक आहेत.
हल्ली नागरिक आपल्या आरोग्यालादेखील महत्त्व देत असल्याने ७३ टक्के नागरिक घरखरेदी करताना आपल्या प्रकल्पात चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅकची सुविधा आहे का हे तपासतात. ४१ टक्के ग्राहक हे वैयक्तिक वापरासाठी दुसरे घर खरेदी करू इच्छित आहेत. तर ५३ टक्के ग्राहक दुसरे घर निसर्गाच्या सानिध्यात व डोंगराळ भागात घेणे पसंत करत आहेत.
कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे ६५ टक्के नागरिकांना मोठ्या घराची गरज भासू लागली आहे, तर ६८ टक्के नागरिक उपनगरांमध्ये घर घेणे पसंत करत आहेत. अनिवासी भारतीयांसाठी, बंगळुरू, पुणे आणि चेन्नई ही पसंतीची शहरे आहेत. यापाठोपाठ चंदीगड, कोची आणि सुरत ही शहरे आहेत.
ॲनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी सांगतात की कोरोनाच्या काळात नागरिकांच्या घरांसाठीच्या अपेक्षा बदलल्या आहेत. परवडणाऱ्या घरांपेक्षा लक्झरी घरांच्या मागणीत झालेली वाढ ही आश्चर्यचकित आहे. कोरोनाच्या काळात अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले असले तरीदेखील घरखरेदी करण्यासाठी करण्यात आलेली सुलभ व्यवस्था ही घरखरेदीसाठी चालना देणारी ठरत आहे.