सहा लाखांचा गंडा
लग्नापूर्वीच उच्चपदस्थ अधिकारी तरुणीला सहा लाखांचा गंडा
लंडनचा नवरदेव निघाला ठग, कोरोना चाचणीचा बहाणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर पदावर असलेल्या २८ वर्षीय तरुणीला ६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार या अंधेरीच्या सहार रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. तिची जीवनसाथी डॉटकॉमवरून लंडनच्या हरदान गुनबीरसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होताच, गुनबीरने लग्नाचे आमिष दाखवून २० डिसेंबर रोजी भारतात येणार असल्याचे सांगितले. विमानाचे तिकीट पाठवून तरुणीचा विश्वास संपादन केला. तो दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याच्याकडे येलो कार्ड व कोविड टेस्ट नसल्याने एअरपोर्टवर थांबवून ठेवल्याचे त्याने सांगितले. कोविड चाचणीसाठी ३५,७०० रुपये आवश्यक असल्याचे सांगितले. तिने ही विश्वास ठेवून पैसे पाठविले. अशा प्रकारे वेगवेगळी कारणे सांगत ठगाने तिच्याकडून ६ लाख ६ हजार ७०० रुपये उकळले. पुढे आणखीन पैशांची मागणी होताच तरुणीला संशय आला. तिने पैसे नसल्याचे सांगितले. याबाबत दिल्ली विमानतळावर चौकशी केली, तेव्हा अशा कुठल्याच व्यक्तीला पकडले नसल्याचे समजताच तिला धक्का बसला. त्यानंतर, गुनबीरही नॉट रिचेबल झाला. यात फसवणूक झाल्याचे समजताच, तरुणीने अंधेरी पोलिसात धाव घेतली.