अतिधोकादायक इमारती : रहिवाशांसोबत होणार बैठक; एकदाच लागणार सोक्षमोक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:06+5:302021-06-17T04:06:06+5:30
मुंबई : म्हाडाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या दोन टप्प्यांच्या सर्वेक्षणाअंती मुंबई शहरातील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून, सदर इमारतींमध्ये ...
मुंबई : म्हाडाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या दोन टप्प्यांच्या सर्वेक्षणाअंती मुंबई शहरातील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून, सदर इमारतींमध्ये वास्तव्य करत असलेल्या रहिवाशांच्या पुनर्विकासाचा, पुनर्वसनाचा किंवा संक्रमण शिबिराचा तिढा काही केल्या सुटेनासा झाला आहे. परिणामी म्हाडा आता याबाबत थेट रहिवाशांसोबत बैठक घेत एकदाचा या विषयाचा सोक्षमोक्ष लावणार आहे.
म्हाडाच्या अतिधोकादायक २१ उपकरप्राप्त इमारतींची बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस पाहणी होत आहे. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या रहिवाशांनी या इमारती तत्काळ रिकाम्या कराव्यात. म्हाडा प्रशासनाला सहकार्य करावे. संक्रमण शिबिराची अडचण असेल तर तसे सांगावे. अतिधोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करू नये, असे आवाहन बुधवारी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी केले. यावेळी येथील काही रहिवाशांनी आमचे स्थलांतरण शहरातील संक्रमण शिबिरातच करावे, असे म्हणणे मांडले.
दरम्यान, अतिधोकादायक इमारतींमध्ये ४६० निवासी व २५७ अनिवासी असे ७१७ रहिवासी आहेत. १९३ रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. २० निवासी रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित २४७ निवासी रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.