हायस्पीड रेल धावणार; रस्त्यावरील ताण कमी होणार! प्रकल्पाच्या विकासासंदर्भात झाली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 03:24 PM2023-05-17T15:24:22+5:302023-05-17T15:25:44+5:30
गुजरातमधील साबरमती, सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार हायस्पीड रेल्वे स्टेशनसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
मुंबई : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे पहिले स्थानक वांद्रे-कुर्ला संकुलात आहे; याचा अभिमान असून, हायस्पीड रेलस्थानकांच्या आसपासच्या परिसराचा विकास हा लास्ट माइल कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करून केल्याने निवासी आणि कार्यालयीन भागांमधील वाहतूक सुलभ होऊन रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होईल, असा दावा एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी केला.
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या स्थानक क्षेत्र विकासासंबंधित सुरुवातीची बैठक वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात मंगळवारी झाली; यावेळी एस. व्ही. आर. श्रीनिवास बोलत होते. गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय, राज्य सरकार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ठाणे महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, जपानचे दूतावास, तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथे आयोजित केल्या जाणाऱ्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थळ पाहणी आणि परिसंवादाचा एक भाग म्हणून ही बैठक होती. बैठकांचे आयोजन केंद्र सरकार, राज्य सरकार, गुजरात सरकार आणि जायका यांनी संयुक्तपणे केले होते.
गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने संयुक्तपणे जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी सोबत मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल स्थानकाच्या परिसराचा क्षेत्र विकासासाठी सामंजस्य करार केला. गुजरातमधील साबरमती, सुरत आणि महाराष्ट्रातील विरार आणि ठाणे या चार हायस्पीड रेल्वे स्टेशनसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
१२ स्थानके प्रकल्पात -
- मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी १.०८ लाख कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
- सुमारे ५०८ किमी अंतराच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात १२ स्थानके असून, त्याचा प्रस्तावित वेग सुमारे ३२० ते ३५० किमी प्रतितास असेल.
- या प्रकल्पामुळे मुंबई शहर, ठाणे, वसई, विरार, बोईसर, तारापूर, पालघर आणि उत्तर महाराष्ट्राला फायदा होईल.
- मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या संरेखनातील १२ स्थानकांपैकी बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्थानके महाराष्ट्रात आहेत ज्यांची लांबी १५६ किमी इतकी आहे.