मुंबई : कुरार गावातील मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ‘कसरती’चे हायटेक धडे देण्यात येणार आहेत. प्रात्यक्षिक, माहिती आणि मार्गदर्शन असलेल्या व्हिडीओ प्रोग्राममधून हिंदी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आज व्यायामाचे धडे मिळाले. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर जॅकी भगनानी याने व्यायामाच्या आधुनिक प्रकारांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रचंड स्पर्धेच्या युगामुळे विद्यार्थी दिवसभर अभ्यास, क्लास आणि होमवर्क यातच गुंतलेले असतात. यातच मोबाइल गेमच्या अतिरेकामुळे त्यांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत व्यायामाचे धडे देण्यासाठी ‘कसरत’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. रोजच्या ठरावीक व्यायामाच्या पद्धतींपेक्षा सोप्या पद्धतीने मजेशीर पद्धतीनेही व्यायाम करता येतो, याचे प्रात्यक्षिक जॅकी भगनानी यांनी दाखविले. ‘कसरत’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाच्या व्हिडीओ प्रोग्राममधून व्यायामाच्या अत्याधुनिक प्रकारांची माहिती देण्यात येणार आहे. आगामी काळात महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना ‘कसरती’चे हायटेक धडे
By admin | Published: January 11, 2017 6:44 AM