लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यापूर्वी यंदा जलअभियंता विभागाकडून नवीन जलवाहिन्यांसह मुंबईतील तलावांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून वेरावली व पाली टेकडी परिसरातील तलावांचा परिसर अतिसंवेदनशील असल्याने पोलिसांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून अत्याधुनिक हाय डेफिनेशन नाइट व्हिजन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरावर २४ तास देखरेख ठेवणे सहजशक्य होणार असून, सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी होणार असल्याने येथील नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
पालिकेच्या एच पूर्व व पश्चिम तसेच के पूर्व व पश्चिम विभागामधील उदंचन केंद्र आणि तलावांच्या देखभालअंतर्गत ५ सेवा तलावांचा समावेश होतो. या परिसरातील नऊ एकर जागेमध्ये जलाशय संरचना, झडप नियंत्रण कक्ष, क्लोरिनेशन प्रकल्प, इतर संबंधित यंत्र आदींसह कर्मचारी निवासस्थान, खुल्या बागेचे भूखंड, रस्ते आणि मार्ग इत्यादी असून, या सर्वांची देखभाल पालिकेच्या जलअभियंता विभागाद्वारे केली जाते. दरम्यान, या तलाव परिसराची नुकतीच पोलिसांना पाहणी केली.
वेरावली टेकडी तलाव क्रमांक १, २, ३ आणि पाली टेकडी तलावस्थळेही अतिसंवेदनशील असल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध सुरक्षा उपाय आखण्याचे पालिका प्रशासनाला सुचविले आहे. सोबतच या परिसरात दहशतवादी कारवाया, असामाजिक घटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता, अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी शिफारस पोलिसांनी केली आहे. त्यानुसार पालिकेने पावले उचलली आहेत.
तिसरा डोळा थिनर लक्ष
तलावांचे विस्तीर्ण क्षेत्र, मानवी सुरक्षेच्या मर्यादा लक्षात घेता पोलिसांच्या शिफारशीनुसार, आयआर बुलेट आउटडोअर, हाय डेफिनेशन नाइट व्हिजन कॅमेरा बसविण्याचा निर्णय जलअभियंता विभागाने घेतला आहे. तलावांचे प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पायऱ्यांचे दरवाजे या ठिकाणी अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टीम’ बसविली जाणार आहे. त्यामुळे पाचही तलाव सुरक्षित राहून नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यास मदत होईल, अशी माहिती उप जलअभियंता राजेश ताम्हाणे यांनी दिली.