मुंबई : भारतीय बुद्धिवान आहेत. पण आपल्या देशात केवळ १ टक्का भारतीयच पीएचडी करतात. ही संख्या चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे. उच्च शिक्षणात भारतीयांचा आकडा चिंताजनक असून याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन इन्स्टिट्युट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीचे मुख्य प्राध्यापक भालचंद्र भानागे यांनी सोमवारी नेहरु विज्ञान केंद्र येथे केले.टेक्नॉलॉजी इर्न्फोमेशन, नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटरर्स,आणि नॅशनल काऊंसिल आॅफ म्युझिअम यांच्या वतीने नेहरु विज्ञान केंद्रात ‘टेक्नोलॉजी व्हिजन २०३५’ या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘राज्य विद्यापीठ आणि उच्च शिक्षण’ या विषयावर प्राध्यापक भानागे बोलत होते. विद्यापीठांविषयी ते म्हणाले की, अजूनही बरीच विद्यापीठ परिपूर्ण नाहीत. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येचा विचार करता उच्च शिक्षणाकडे वळणाऱ्यांची संख्या कमी आहे. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना परिपूर्ण करण्याकडे भर देणे आवश्यक आहे. ‘टेक्नोलॉजी २०३५’ चा विचार करता यावेळी शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रात होणारे बदल चर्चिण्यात आले. यात मुख्यत्वे माहिती आणि संवाद तंत्र, उर्जा, आरोग्य, उद्योग या विषयांचा समावेश होता. यावेळी उपस्थित वक्त्यांनी २०३५ मधील विविध क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या शक्यतांवर उपस्थितांनी मते मांडली आणि अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काय करावे याविषयी चर्चा केली. याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळ फोंडके, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, दिल्ली जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्राध्यापक वरुण सहानी, इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलाजी, मुंबईचे प्राध्यापक डॉ. एस.पी. सुखात्मे, आयआटी मद्रासचे अशोक झुनझुनवाला उपस्थित होते.
उच्च शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे
By admin | Published: April 19, 2016 2:40 AM