Join us

उच्च शिक्षणाच्या संधीचे दार होणार खुले, देश-विदेशातील संस्थांशी मुंबई विद्यापीठाचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 7:07 PM

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुंबई - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या धर्तीवर बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध संधीचे दालन खुले करण्यासाठी देश- विदेशातील ३६ नामांकित उच्च शिक्षण संस्थांबरोबर मुंबई विद्यापीठाने आज शैक्षणिक सामंजस्य करार केले.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्व विशद करून या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विविध उच्च शिक्षण संस्थांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यासाठी उचलेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे करार

प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टिकोनातूनही या करारांचे महत्व अधोरेखित होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान –प्रदान विविध शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, कृत्रिम बुद्धीमत्ता, सह सांस्कृतिक कार्ये आणि शैक्षणिक साहित्य-संसाधन निर्मिती व हस्तांतरण अशा विविध क्षेत्रातील संधीचे दालन यानिमित्ताने खुले होणार आहे.

या संस्थाशी करार

सामंजस्य करार केलेल्या संस्थामध्ये ८ परदेशी विद्यापीठे, युरोपीयन कंसोर्सियामधील ७ विद्यापीठे, १० औद्योगिक संस्था, ५ शासकीय संस्था, ३ राज्ये विद्यापीठे, समीर-आयआयटी मुंबई, सेक्टर स्कील काँऊंसिल, स्टार्टअप, एनजीओ अशा संस्था आहेत. पर्ड्यू विद्यापीठ, सेंट लुईस विद्यापीठ, मॉरिशस कल्चरल सेंटर, युनिव्हर्सिटी ऑफ लिस्बन, बोलग्ना, मलहाऊस डाकर, स्ट्रासबर्ग, गोएथे युनिव्हर्सिटी जर्मनी, ट्रायस युनिव्हर्सिटी फ्रांस, इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी, प्राइस वॉटरहाउस कुपर, रिटेलर्स असोसिएशन स्किल कौन्सिल ऑफ इंडिया, सासमीर, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ पॅकेजिंग, आयसीसीआर, फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, बार्टी, सीआयडीएम, स्वामीनारायण एकेडमिक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, वृंदावन गुरुकुल, ओटीएआय, द कलर सोसायटी, जिल्हाधिकारी मुंबई उपनगर- ठाणे, गो शुन्य संस्थांबरोबर करार करण्यात आले. मुंबई विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांचे नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी आयसीसीआर सोबत करण्यात आलेल्या कराराचे महत्व अधोरेखित होणार आहे.

टॅग्स :मुंबई