कम्प्यूटर ऑपरेटर आणि क्लार्कपेक्षा ड्रायव्हरला जास्त वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 05:49 PM2020-08-28T17:49:23+5:302020-08-28T17:49:49+5:30

एमएमआरडीएतल्या कामांसाठी कर्मचा-यांचे आऊटसोर्सिंग

Higher salary to driver than computer operator and clerk | कम्प्यूटर ऑपरेटर आणि क्लार्कपेक्षा ड्रायव्हरला जास्त वेतन

कम्प्यूटर ऑपरेटर आणि क्लार्कपेक्षा ड्रायव्हरला जास्त वेतन

googlenewsNext

मुंबई एमएमआरडीएने आपल्या दैनंदिन कार्यालयीन कामांसाठी १९६ पदांवरील कर्मचा-यांची नियुक्ती आऊटसोर्सिंग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचा-यांच्या पुरवठ्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार असली तरी कोणत्या श्रेणीतील कर्मचा-याला किती वेतन द्यायचे हे एमएमआरडीएने निश्चित केले आहे. विशेष म्हणजे कम्प्यूटर आँपरेटर, क्लार्क आणि अकाऊंटंट या पदांवरील कर्मचा-यांपेक्षा ड्रायव्हरचे काम करणा-यांना जास्त वेतन दिले जाणार आहे.

एमएमआरडीएच्या कामाचा पसारा दिवसागणीक वाढत असल्याने त्यांना कर्मचा-यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. कर्मचा-यांचा भरतीवर निर्बंध असल्याने आवश्यक असलेल्या काही कर्मचा-यांची भरतीसाठी प्राधिकरणाने आऊटसोर्सिंगचा मार्ग स्वीकारला आहे. विधी सहाय्यक (५), कंम्प्युटर आँपरेटर (७०), अकाऊंटंट (६), लँण्ड सुपरवायझर (२०), ड्रायव्हर (१५) आणि शिपाई (८०) अशा एकूण १९६ पदांवरील कर्मचा-यांची नियुक्ती त्या माध्यमातून केली जाणार आहे. हे काम कंत्राटदारामार्फत करण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा प्रसिध्द केल्या आहेत. त्यात दोन वर्षांसाठी या कर्मचा-यांची नियुक्ती करण्याचे प्रस्तावित असून त्यापोटी १० कोटी २० लाख रुपये एमएमआरडीएच्या तिजोरीतून खर्च करावे लागणार आहेत.

-    विधी सहाय्यकासाठी कायद्याची पदवी आणि दीड वर्षाचा अनुभव असा निकष असून या पाच पदांसाठी मासिक २० हजार ३१५ रुपये वेतन मिळणार आहे. लँण्ड सुपरवायझरचीसुध्दा १५ पदे आहेत. त्यांची शैक्षणिक अर्हता बारावी पास आणि आयटीआयचा अभ्यासक्रम अशी असली तरी त्यांनाही विधी सहाय्यकाएवढेच वेतन दिले जाणार आहे.

-    कंम्प्युटर आँपरेटर आणि क्लार्कची ७० पदे भरली जाणार आहेत. कोणत्याही शाखेची पदवी, मराठी आणि इंग्रजी टायपिंग तसेच वर्ड एक्सेल पावर पाँईंटचे ज्ञानही असणे आवश्यक आहे. अकाऊंटंट पदासाठी पदवीसह अकाऊंट आणि टँलीचे ज्ञान आवश्यक आहे. परंतु, या दोन्ही पदांसाठी १५ हजार ६५३ इतके वेतन निश्चित करण्यात आले आहे.

-      दहावीपर्यंत शिक्षण, मराठी बोलता येणारे, हिंदी इंग्रजीचे किमान ज्ञान असलेल्या आणि वाहन चालविण्याचा दोन वर्षाचा अनुभव असलेल्यांना ड्रायव्हरची नोकरी मिळू शकते. त्यांना १६ हजार ५८५ रुपये इतके वेतन दिले जाईल. तर, शिपाई पदांवर रुजू होणा-या ८० जणांसाठी १३ हजार ३२२ ही वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.

मोबाईलवर गाणी ऐकल्यास हजार रुपये दंड

कंत्राटदार आणि त्यांचामार्फत नियुक्त केल्या जाणा-या कर्मचा-यांसाठी एमएमआरडीएने अटी आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. गैरवर्तनासाठी दंडाची रक्कमही ठरली आहे. कामाच्या वेळात मोबाईलवर गाणी ऐकताना किंवा व्हीडीओ पाहताना कर्मचारी आढळला तर एक हजार रुपये दंड आहे. या पदावरील नियुक्तीचा गैरवापर केल्यास १० हजार, नागरीकांकडून गैरवर्तणूकीची तक्रार आल्यास दोन हजार रुपये दंड असेल. 

Web Title: Higher salary to driver than computer operator and clerk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.