मुंबई : कोरोना काळात वाढलेला खर्च आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला अखेर मोठा दिलासा मिळाला. गेले महिनाभर मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी राबविलेल्या मोहिमेला यश आले आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत पाच हजार १३५ कोटी ४३ लाख रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला. महापालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक ९८ टक्के वसुली असल्याने आता केवळ ६४ कोटी ५७ लाख रुपयांची तूट आहे. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात मालमत्ता करातून पाच हजार दोनशे कोटी रुपये उत्पन्न जमा करण्याचे पालिकेचे लक्ष्य होते. मात्र, गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग मुंबईत सुरू झाल्यानंतर कर वसुली लांबणीवर पडली. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात कर वसुलीत मोठी घट झाली होती, तर मार्च ते डिसेंबर २०२० पर्यंत जेमतेम एक हजार कोटी रुपये कर वसुली करण्यात आली. त्यामुळे पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाला कर वसुलीचे लक्ष्य प्रशासनाने दिले.कर न भरणाऱ्या थकबाकीदारांची जलजोडणी खंडित करणे, वाहने - वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करणे अशा कारवाया करण्यात आल्या. थकीत कर शेवटच्या दिवशी भरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आशावादी होते. अखेर ३१ मार्च २०२१ पर्यंत एकूण पाच हजार १३५.४३ कोटी जमा झाले आहेत. ३१ मार्च २०२० रोजी चार हजार १६१ कोटी रुपये जमा झाले होते, अशी माहिती सहआयुक्त सुनील धामणे यांनी दिली. अशी केली कारवाई : वर्षभरात ११ हजार ६६१ मालमत्तांवर टाच आणण्याची कारवाई करण्यात आली. ‘एच पूर्व’ विभागात सर्वाधिक दोन हजार ५३ मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली, तर ४७९ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली. याअंतर्गत ‘टी’ विभागात सर्वाधिक १४१ इतक्या मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली, तर ५० ठिकाणी वाहने, संगणक, वातानुकूलन यंत्रणा जप्त करण्यात आल्या.
मालमत्ता करात महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक 98% वसुली, शेवटच्या दिवशी तिजोरीत मोठी भर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 6:44 AM