मुंबई : महावितरणने १७ एप्रिल रोजी राज्यात १९ हजार ८१६ मेगावॅट विजेचा यशस्वी पुरवठा केला असून, या दिवशी विजेची मागणी १९ हजार ८१६ मेगावॅट नोंदविण्यात आली होती. मुंबईत १७ एप्रिलला मुंबईची विजेची सर्वोच्च कमाल मागणी ३ हजार ५४२ मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली तर संपूर्ण राज्याची विजेची कमाल मागणी २३ हजार ३५८ एवढी नोंदविण्यात आली.मुंबईसह राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून, वाढत्या उकाड्यामुळे विजेची उपकरणे अधिक वेगाने आणि अधिक काळ सुरू राहत आहेत. परिणामी विजेच्या मागणीत वाढ नोंदविण्यात येत असून, वाढत्या मागणीनुसार विजेचा पुरवठा करण्यात येत असल्याचा दावा वीज कंपन्यांकडून करण्यात येत आहे. मागील काही वर्षांत वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढ्या विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले आहे. राज्यात वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील विजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्य झाले आहे.- रिलायन्सच्या वितरण क्षेत्रात विजेची मागणी १६५० मेगावॅटपर्यंत जाऊ शकते. परिणामी, या काळात वीज ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून रिलायन्सने १२६२ मेगावॅट विजेचा दीर्घकालीन करार केला आहे. तसेच २५० मेगावॅट अतिरिक्त वीज करार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त गरज भासल्यास बाजारातून अधिक वीज घेण्याची तयारी रिलायन्सने केली आहे.मागील वर्षी १ जून २०१७ रोजी रिलायन्सच्या विजेची मागणी १६०५ मेगावॅटवर गेली होती. या काळात विजेची मागणी दुपारी जास्त नोंदविण्यात आली होती. पावसाळ्यानंतर तापमान वाढल्यामुळे ६ आॅक्टोबर २०१७ रोजी विजेची मागणी १५५० मेगावॅटवर गेली होती.... अशी उपलब्ध होते महावितरणकडे वीजसध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून ६ हजार ५०० मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून सुमारे ४ हजार ५००, खासगी प्रकल्पातून दीर्घ मुदतीच्या कराराद्वारे सुमारे ४ हजार २०० मेगावॅट, लघू मुदतीच्या कराराद्वारे सुमारे ६३५ मेगावॅट तर इतर विविध स्रोतांकडून सुमारे ३ हजार ९८१ वीज उपलब्ध होत आहे.
मुंबईत विजेची सर्वोच्च कमाल मागणी ३,५४२ मेगावॅट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:13 AM