मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेण्याकरिता एकूण २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. यात सर्वाधिक मागणी बीकॉमला आहे. बीकॉमला प्रवेश घेण्यात १.८८ लाख विद्यार्थ्यांनी रस दाखवला आहे. त्याचबरोबर बीकॉम (अकाऊंट एँड फायनान्स), बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती लाभली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या अभ्यासक्रमांकरिता १३ जूनला संध्याकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांद्वारे जाहीर केली जाणार आहे. २५ मे पासून ही प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे. विद्यापीठाने केलेल्या वेळापत्रकानुसार व प्रचलित नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबवली जाणार आहे.
शाखानिहाय अर्ज
विद्याशाखानिहाय सादर केलेल्या प्रवेश अर्जांमध्ये सर्वाधिक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ४,७५,०७९ एवढे अर्ज असून, विज्ञान विद्याशाखेसाठी २,९२,६०० अर्ज, मानव्यविज्ञान शाखेसाठी १,०२,८२५ एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत.
सर्वाधिक मागणी असलेले अभ्यासक्रम (सादर झालेले अर्ज)
बीकॉम - १,८८,३९०
बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) - ४१,०५१
बीकॉम (अकाऊंट एँड फायनान्स) - १,११,८१२
बीए - ६०,८२६
बीएस्सी आयटी - १,०४,९८४
बीएस्सी - ४१,२९२
बीएस्सी कम्प्युटर सायन्स - ६६,१८७
बीएएमएमसी (स्वायत्त) - २५,६४०
बीकॉम (बँकींग अँड इन्शूरंस) (स्वायत्त) - १२,९५२
बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) (स्वायत्त) - २५,१२३
बीएस्सी (बायोटेक्नोलॉजी) (स्वायत्त) - १८,९५३
बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (ई-कॉमर्स) (स्वायत्त) - १४, ८६१
नवीन काय?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्जिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.
सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी.
डॉ. पूजा रौंदळे, संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळ