पुण्यातील घरांच्या किमतीत सर्वाधिक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:34 AM2020-12-17T04:34:11+5:302020-12-17T04:34:11+5:30
सात वर्षांत दर ३८ टक्क्यांनी वाढले : मुंबईतील भाव देशात सर्वाधिक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या सात वर्षांत ...
सात वर्षांत दर ३८ टक्क्यांनी वाढले : मुंबईतील भाव देशात सर्वाधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या सात वर्षांत देशातील सात प्रमुख महानगरांमधील घरांच्या किमतींमध्ये सरासरी १४ टक्के वाढ नोंदविण्यात आली. विशेष म्हणजे, झपाट्याने विस्तारणाऱ्या पुणे शहराच्या परिसरात सर्वाधिक ३८ टक्के दरवाढ झाल्याचे समाेर आले. मुंबई शहरातील भाव हे देशातील अन्य कोणत्याही शहराच्या तुलनेत सर्वाधिक असले, तरी येथील वाढ ही ११ टक्क्यांवरच असल्याची माहिती ॲनरॉक पॉपर्टीने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षण अहवालातून पुढे आली.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत प्रति चौरस फुटांसाठी सरासरी ४,५८० रुपये आकारले जात आहेत. मुंबईतला दर त्यापेक्षा दुपटीने जास्त असून, येथील मालमत्तांचा सरासरी दर १० हजार ६१० रुपयांवर गेला आहे. दिल्लीपेक्षा पुण्यातील मालमत्तांची किंमतही जास्त असल्याचे अहवाल सांगतो. २०१६ सालापासून जीएसटी, नोटबंदी, रेरा आदी कारणांमुळे मालत्तांच्या भाववाढीला ग्रहण लागले आहे. मात्र, गेल्या सात वर्षांचा आलेख मांडला, तर या दरांमध्ये सरासरी १४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.
कोरोना संक्रमाणाच्या काळात घराच्या विक्रीला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी विकासकांनी किमती कमी केल्या. त्यानंतरही हे दर २०१३ च्या तुलनेत जास्तच असल्याचेही अधोरेखीत होत आहे.
* गुंतवणूकदार पुन्हा गृहखरेदीकडे वळणार?
पूर्वी घरांच्या २० टक्के खरेदीचा वाटा हा गुंतवणूकदारांचा (इन्व्हेस्टर्स) असायचा. मात्र, गेल्या दोन वर्षांत घरांच्या किमतीत अपेक्षित वाढ होत नसल्याने तो टक्का कमी झाला असून, प्रत्यक्ष वापर करणाऱ्यांकडूनच गृहखरेदी केली जात आहे. मात्र आता पुन्हा या गुंतवणूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून, त्यांच्याकडून खरेदीचे व्यवहार वाढतील अशी शक्यता ॲनरॉकच्या रिसर्च टीमचे संचालक प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
* निवासी मालमत्तांच्या किमतीत गेल्या सात वर्षांत झालेली भाववाढ (दर प्रति चौ.मी)
शहर २०१३ २०२० वाढ (टक्के)
पुणे ३९८० ५५१० ३८
मुंबई ९५७८ १०६१० ११
दिल्ली ४४८८ ४५८० २
कोलकाता ३८५० ४३८५ १४
हैदराबाद ३४८५ ४१९५ २०
चेन्नई ४७७० ४९३५ ३
बंगळुरू ४१२० ४९५५ २०
एकूण ४८९५ ५५९९ १४
...................