आरटीई प्रवेश प्रक्रियेत झाली सर्वाधिक वाढ; आतापर्यंत मुंबई विभागांत ३ हजार ८२१ प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 12:40 AM2020-12-04T00:40:13+5:302020-12-04T00:40:31+5:30
मागील वर्षी ३ हजार ४३६ जागांवर प्रवेशनिश्चिती होऊ शकली होती आणि ४ हजाराहून अधिक जागा रिक्त होत्या.
मुंबई : मुंबई विभागातील आरटीई २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये २०१४ ते २०२० या काळांतील सर्वाधिक प्रवेश झाल्याचे चित्र आहे. मुंबई विभागात यंदा आतापर्यंत ३ हजार ८२१ प्रवेश निश्चित झाले आहेत,
मागील वर्षी हा आकडा ३ हजार ४३६ इतका होता. यंदा प्रवेशासाठी ३६७ शाळांत एकूण ७ हजार ०२ उपलब्ध रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची संधी दिली जाणार असून, या प्रवेशात आणखी वाढ होणार आहे. मुंबई विभागात अद्याप प्रवेशाच्या ३ हजार १८१ जागा रिक्त आहेत. मुंबई विभागात यंदा आरटीई प्रवेशांसाठी ३६७ शाळांनी नोंदणी केली असून एकूण ७२०२ जागा उपलब्ध आहेत. यामधील ६५० जागा या पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी, तर पहिली इयत्तेसाठी ६५०२ जागा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध आहेत.
मागील वर्षी ३ हजार ४३६ जागांवर प्रवेशनिश्चिती होऊ शकली होती आणि ४ हजाराहून अधिक जागा रिक्त होत्या. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थी स्थलांतरित होणे, शाळा बंद असणे अशा कारणामुळे विद्यार्थी, पालक प्रवेश प्रक्रियेत निवड होऊनही प्रवेशनिश्चिती करू शकले नाहीत. पहिल्या सोडतीच्या फेरीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २८ नोव्हेंबरपर्यंत ३ वेळा प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीई २५ टक्केअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर २०१४-१५ साली फक्त १३ टक्के प्रवेश होऊ शकले होते. २०१५ साली त्यात हळूहळू वाढ होऊन १४ प्रवेश होऊ शकले होते. त्यानंतर पुढील वर्षात प्रवेशाची टक्केवारी २५ टक्के, ३७ टक्के, ३८ टक्के आणि मागील वर्षी ४५ टक्के अशी वाढत गेली. पालिका शिक्षण विभाग आणि उपसंचालक कार्यालयाचे प्रयत्न, पालकांमध्ये आरटीई प्रवेशाबद्दल जनजागृती यांमुळे ही वाढ होऊ शकल्याची प्रतिक्रिया आरटीई प्रवेश प्रक्रिया समन्वयकांनी दिली.