Join us

अग्निशमन दलाकडून सर्वांत उंच शिडीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 4:49 AM

विशेषत: वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरासह लगतच्या परिसरावर आगीचा धूर पसरल्याने येथील दृश्यमानता कमी झाली होती.

मुंबई : दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या गच्चीवर कर्मचाऱ्यांसह तब्बल १०० हून अधिक नागरिक अडकल्याने अग्निशमन दलाने आणखी वेगाने बचावकार्य हाती घेतले. आग विझविण्याचे काम सुरू असतानाच दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या गच्चीवर अडकलेल्यांना सुखरूप खाली उतरविण्यासाठी अग्निशमन दलाकडील सर्वांत उंच शिडीचा वापर करण्यात आला. समुद्राहून वेगाने वाहत असलेल्या वाºयामुळे आग पसरत असतानाच धुराचे लोटही परिसरावर जमा झाले. विशेषत: वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरासह लगतच्या परिसरावर आगीचा धूर पसरल्याने येथील दृश्यमानता कमी झाली होती.

याच काळात बचाव कार्याचा वेग वाढतच असताना सुरुवातीला पावणेपाचच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून १५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पाचच्या सुमारास बचाव कार्याला आणखी वेग आला आणि २० ते २२ जणांना दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाकडून हे काम सुरू असतानाच घटनास्थळावरील साधनसामग्रीत आणखी वाढ करण्यात आली. सायंकाळी ६ च्या सुमारास दुर्घटनाग्रस्त इमारतीमधून सुखरूप बाहेर काढलेल्यांचा आकडा ८४ वर गेला. तरीही ३० ते ३५ जण गच्चीवर अडकले होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :आग