CoronaVirus News: राज्यात २४ तासांत सर्वाधिक १ हजार ८ रुग्णांची नोंद; २६ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:03 AM2020-05-02T06:03:17+5:302020-05-02T06:03:34+5:30
राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ४८५वर पोहोचला आहे.
मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र तरीही शुक्रवारी राज्यात आतापर्यंतच्या २४ तासांतील सर्वाधिक १ हजार ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ४८५वर पोहोचला आहे.
शुक्रवारी झालेल्या २६ मृत्यूंंमध्ये पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३, पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महापालिकेतील १, ठाणे महापालिकेतील १, नांदेडमधील १, औरंगाबाद मनपामधील १ आणि परभणीतील एकाचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. मृत्यूंंमध्ये १८ पुरुष तर ८ महिला आहेत. २६ मृत्यूंपैकी ६० किंवा त्यावरील वयाचे १४ रुग्ण आहेत. ११ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आहेत, तर एक ४० वर्षांखालील आहे. २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार आढळले. शुक्रवारी १०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत १, ८७९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाइन तर ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.