मध्यम वयाेगटातील काेरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:06 AM2021-01-15T04:06:49+5:302021-01-15T04:06:49+5:30
४ लाख बाधित : ६७ हजार ९७२ मुलांनाही संसर्ग लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ ...
४ लाख बाधित : ६७ हजार ९७२ मुलांनाही संसर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ७८ हजार झाली असून यात सर्वाधिक संक्रमण मध्यमवयीन गटातील व्यक्तींना झाल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. राज्यात ३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक व्यक्ती कोरोनाग्रस्त आहेत, ही संख्या ४ लाख १८ हजार २९७ झाली असून एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २१.१० टक्क्यांवर आहे. तर दुसरीकडे कोविडग्रस्त नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या रुग्णांची संख्या ६७ हजार ९७२ झाली असून याचे प्रमाण ३.४३ टक्के आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील तीन वयोगटांत तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. यात २१ ते ३० वयोगटात ३ लाख २८ हजार ९६३, ४१ ते ५० वयोगटात ३ लाख ५५ हजार ७५५ आणि ५१ ते ६० वयोगटात ३ लाख २१ हजार ८३९ इतके बाधित असल्याचे समाेर आले. ११ ते २० वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार ८०२ झाली आहे.
* १०१ ते ११० वर्षांपर्यंतच्या १७ जणांना लागण
६१ ते ७० वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १९ हजार १०६, तर ७१ ते ८० वयोगटातील बाधितांची संख्या १ लाख ४ हजार ९७३ आहे. राज्यात सर्वांत कमी बाधित १०१ ते ११० वयोगटातील असून ही संख्या १७ आहे. तर ९१ ते १०० वयोगटात ३ हजार ७७३ रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्येत अनुक्रमे यांचे प्रमाण ०.०० आणि ०.१९ टक्के इतके आहे. ८१ ते ९० या वयोगटातील काेराेनाबाधित २९ हजार ७२२ एवढे असून त्यांचे प्रमाण १.५० टक्के आहे.
...............................................