१३५ पैकी ७० टाळेबंदीच्या काळातील; १८ ते ३५ वयोगटांतील पीडितांचे प्रमाण सर्वाधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिलांना संकटकाळात एकाच छताखाली वैद्यकीय आणि विधी सेवा मिळाव्यात, पोलीस दलाच्या मदतीसह समुपदेशनाची सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने सखी वन स्टाॅप सेंटरची सुरुवात करण्यात आली. मुंबईत के.ई.एम. रुग्णालयातील सेंटरमध्ये वर्षभरात कौटुंबिक हिंसाचाराची सर्वाधिक तक्रारी आल्या. आलेल्या १३५ पैकी ७० तक्रारी टाळेबंदीच्या काळातील होत्या.
हिंसेपासून महिलांचे संरक्षण करणे, हिंसाग्रस्त महिला आणि बालकांना नैतिक आधार देणे, हिंसेमुळे होणारे मानसिक खच्चीकरण कमी करणे इत्यादी मदत या सेंटरमार्फत केली जाते. सेंटरमध्ये विविध तक्रारी घेऊन आलेल्यांपैकी १८८ प्रकरणात समुपदेशन, ६४ जणांना विधी सेवा, २७ जणांना वैद्यकीय सेवा, १६ जणांना पोलीस सहकार्य, १४ प्रकरणांत निवाऱ्याची व्यवस्था आणि तीन प्रकरणांत अन्य प्रकारची मदत करण्यात आली. विशेष म्हणजे १८ ते ३५ वयोगटांतील पीडितांचे प्रमाण यात सर्वाधिक होते.
* अशा दाखल झाल्या तक्रारी
पहिल्या वर्षात एकूण १९२ प्रकरणे हाताळण्यात आली. त्यापैकी १३५ काैटुंबिक हिंसाचाराची होती. ७० प्रकरणे टाळेबंदीच्या काळातील होती. यातील १८ प्रकरणात सेंटरच्या पुढाकाराने समेट घडविण्यात आला. लैंगिक अत्याचाराची १४, पोक्सोअंतर्गत १७ प्रकरणे, तर अन्य गुन्ह्यांची १७, बालविवाह ४, हुड्यांसाठी झालेला छळ ३, बलात्कार आणि ट्रॅफिकिंगची प्रत्येकी एक-एक प्रकरणे दाखल झाली. १३० महिलांना वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात आल्या. सेंटरने टाळेबंदीच्या काळात घरातील गंभीर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातून तीन महिलांची सुटका केली. शिवाय, दोन महिला ज्या रस्त्यावर राहत होत्या, त्यांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
* एकाच छताखाली मिळाली वैद्यकीय, विधी सेवा, पोलिसांची मदत
के.ई.एम. रुग्णालयातील सखी वन स्टाॅप सेंटरमध्ये पहिल्या वर्षभरात १९ प्रवेशिताना निवारा पुरविण्यात आला. एक १७ वर्षीय युवतीला प्रेमप्रकरणात अडकवून गंंभीर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यातून पीडिता पाच महिन्यांची गरोदर राहिली. सेंटरच्या पुढाकाराने वैद्यकीय देखरेखीत गर्भपात करण्यात आला. तिच्या आईवडिलांचे समुपदेशन करून पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार नोंदविण्यास त्यांना तयार केले. सध्या ही युवती आपल्या घरी सुरक्षित आहे. सेंटरच्या हस्तक्षेपामुळे पालकांच्या मनातील बदनामीची भीती दूर झाली. युवतीला एकाच छताखाली तत्काळ वैद्यकीय, विधी सेवा आणि पोलीस मदत मिळण्यास मदत झाली.
.....................